अकोला: अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी वापरले जाणारे “यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप” १ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. अनारक्षित तिकीट बुकिंगची सुविधा पूर्णपणे “रेलवन अ‍ॅप”मध्ये समाविष्ट करण्यात आली. सर्व सेवा आता एकाच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, डिजिटल सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि रेल्वे प्रवास अधिक सोपा व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने “रेलवन अ‍ॅप” हे एक सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ म्हणून विकसित केले आहे. या अ‍ॅपद्वारे रेल्वे प्रवासाशी संबंधित जवळपास सर्व आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर ३ टक्के सवलत; विविध सुविधा एकाच अ‍ॅपवर

प्रवाशांना वेगवेगळी अ‍ॅप वापरण्याची गरज भासणार नाही. सध्या रेलवन अ‍ॅपवर अनारक्षित तिकीट बुकिंगवर १४ जूनपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ३ टक्के सवलत दिली जात आहे. “रेलवन अ‍ॅप”द्वारे प्रवाशांना आरक्षित व अनारक्षित तिकीट बुकिंग, प्लॅटफॉर्म तिकीट, लाईव्ह ट्रेन स्थिती, आरक्षण तपशील, तिकीट रद्द करणे व परतावा, रेल मदत सेवा, तक्रार नोंदणी व निवारण तसेच गाडीत भोजन बुकिंग अशा विविध सुविधा एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सिझन तिकीट हस्तांतरित करण्याची सुविधा

सध्या “यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप” वापरणारे सर्व प्रवासी त्यांच्या विद्यमान वापरकर्ता आयडीद्वारे सहजपणे “रेलवन अ‍ॅप”वर स्थलांतर करू शकतात. यासाठी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅपवर बुक केलेल्या सिझन तिकिटांसाठी ‘Show Ticket’ विभागात “Transfer Ticket” हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्याद्वारे प्रवाशांना सिझन तिकीट हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल.

‘सिंगल साइन-ऑन’ सुविधा

या अ‍ॅपची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ‘सिंगल साइन-ऑन’ सुविधा. याअंतर्गत प्रवासी पूर्वी वापरलेल्या रेलकनेक्ट किंवा यूटीएस ऑन मोबाइलच्या वापरकर्ता आयडीनेच लॉगिन करू शकतात. तसेच रेल्वे ई-वॉलेटची सुविधा उपलब्ध असून, अनारक्षित तिकीट खरेदी करताना प्रवाशांना ३ टक्के सवलतीचा लाभ मिळतो. “रेलवन अ‍ॅप” डाउनलोड करून “यूटीएस ऑन मोबाइल अ‍ॅप”वरून “रेलवन अ‍ॅप”वर स्थलांतर करावे आणि एकात्मिक डिजिटल सेवांचा लाभ घेत रेल्वे प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांना करण्यात आले आहे. या ॲपमुळे प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे.