वर्धा : कधीही आकाशात झेप नाही, स्वतः अन्न शोधले नाही, जगण्याचा संघर्ष नाही, स्वजातीयासोबत स्पर्धा, भांडण झाले नाही, मानवी संकटाचा सामना नाही आणि बरेच काही नाही नाही. पण म्हणतात नां, जीवनावरचे प्रेम सगळे काही शिकवून जाते. मानव असो की प्राणी असो की पक्षी.

एका भारतीय गिधाडाची कथा

९९ टक्के प्रजाती लुप्त होण्याची स्थिती आली असतांना या पक्ष्यास जगविण्याचा प्रयत्न सूरू झाला तो २००२ साली. भारतीय गिधाड हा तो भव्य पक्षी. पेंच प्रकल्पत या पक्ष्याच्या ९ व ५ अश्या वेगवेगळ्या १४ पक्ष्यांचे संगोपन सूरू झाले. सगळं काही जागेवरच. म्हणुन पक्षी मोठे झाले, तेव्हा त्यांना नैसर्गिक वातावरणात सोडण्याचा निर्णय झाला. प्रश्न पडला की आजवर निसर्ग किंवा मानवी संकटास सामोरे नं गेलेले हे मुके जीव जगणार कां ? कारण नैसर्गिक जीवनाचा अनुभव शून्य. पण हार मानतील ते पक्षीतज्ञ कसे ? प्रयत्नास यश आले आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ( BNHS ) च्या संशोधकांसाठी एक आशेचा अंकुर फुटला.

असा झाला प्रवास

गत काही दशकात भारतात गिधाड संख्या झपाट्याने कमी झाली. म्हणुन संवर्धन प्रयत्न सूरू झाले, असे BNHS चे संचालक किशोर रिठे सांगतात. या कार्यक्रमातील एक जीव म्हणजे ‘ जे १३२ ‘ हे एक गिधाड. बंदिवासात वाढलेल्या दुसऱ्या तुकडीपैकी एक. प्रारंभी ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यास पेंच प्रकल्पात सोडण्यात आले होते. पण बघतो तर काय, अवघ्या २० दिवसात ते ७५० किलोमीटरचा प्रवास करीत नाशिकला पोहचले.

ताब्यात घेत उपचार

नाशिक येथे या गिधाडाची प्रकृती खालावली. पुन्हा त्यास ताब्यात घेण्यात आले. उपचार करण्यात आले. परत सोडण्यात आले. पण सुरक्षितता म्हणुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. पुर्ण सुदृढ झाल्यावर त्यास ७ जून २०२६ रोजी नाशिकच्या निसर्गात मुक्त करण्यात आले. मग मात्र या जीवाने मागे वळून पाहलेच नाही.

आजचा ५७ वा दिवस

सॅटेलाईट ट्रेकिंगच्या माध्यमातून माहिती घेतल्या जात होती. त्यात प्राप्त माहितीनुसार गत ८ आठवड्यात त्याने आकाशात १ हजार ६१८ किलोमीटरचा दीर्घ प्रवास पुर्ण केला. विशेष म्हणजे १७ जून रोजी त्याने एकाच दिवसात तब्बल १६८ किलोमीटरचे उड्डाण केले. एक मोठी परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्याचे दिसून आले.

अफाट क्षमता आणि सर्व थक्क

एक महत्वाची बाब यात स्पष्ट झाली. ती ही की या गिधाडाने आता स्वतःला निसर्गाची जुळवून घेतले आहे. नाशिकच्या डोल ओहोळ आणि देव डोंगरा भागात हे मानवी देखरेखीत जगलेले गिधाड आता अन्य वन्य गिधाडांच्या थव्यात एकरूप झाले आहे. मुसळधार पाऊस असो की अन्य वातावरण, हे गिधाड स्वतःचे अन्न ( मृतदेह ) स्वतः शोधून खात आहे, असे निरीक्षण आहे.

किशोर रिठे म्हणतात…

या गिधाडाचा असा प्रवास गिधाड संवर्धन मोहिमेसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. सध्या हे गिधाड नाशिक व गुजरातच्या वलसाड जिल्ह्याच्या सीमाभागात विहंग करीत आहे. मानवी देखरेखीत वाढवलेले पक्षी अनेकदा निसर्गात टिकून राहू शकत नाही. मात्र हे ‘ जे १३२ ‘ गिधाड अशी भिती झुगारून देणारे ठरले. जगण्याची प्रबळ ईच्छा, उड्डाण किमया व नैसर्गिक अधिवासाशी जुळवून घेण्याची क्षमता यामुळे हे गिधाड आशा उंचावून गेले.ते स्पर्धा करू लागले. हार मानायची नाही, हे शिकता आले. अश्या प्रयोगत इतर बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ हे देश अयशस्वी झालेत. पण आम्हास यश. सोडण्यात आलेल्या १४ पैकी ११ या पक्ष्यांचा मागोवा आहे. वीज तारांचे जाळे हा मोठा धोका.