घुग्घुस, ताडाळी, बल्लारपूर व चंद्रपूर या चार क्लस्टरमधील उद्योगबंदी उठविण्यात तब्बल सहा वर्षांनी यश आले असून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याला तत्वत: मान्यता दिलेली आहेत. यासंदर्भातील अधिकृत आदेश येत्या ३० मे रोजी निघतील, अशी माहिती केंद्रीय खते व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर ताडोबाचा इको सेन्सेटीव्ह झोन तातडीने जाहीर करावा, अशीही मागणी वनमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.
प्रदूषणात देशातील पहिल्या सहा शहरांमध्ये समावेश असलेल्या या जिल्ह्य़ात २०१० पासून उद्योगबंदी होती, त्यामुळे चंद्रपूर, घुग्घुस, बल्लारपूर व ताडाळी औद्योगिक क्षेत्रात गेल्या एकही नवा उद्योग सुरू करता आलेला नाही, तसेच कोणत्याही नवीन उद्योगाला परवानगीही देता न आल्याने या जिल्ह्य़ाचा विकास खंडीत झाला होता, त्यामुळे बेरोजगारीचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता उद्योगबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या जिल्ह्य़ातील प्रदूषण कशा पध्दतीने कमी करता येईल, याकडेही लक्ष दिले. सर्वप्रथम चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ३० ते ३५ वष्रे जुने २१० मेगाव्ॉटचे दोन संच बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयासोबतच ऊर्जामंत्र्यांकडेही पाठपुरावा केला व एका पाठोपाठ एक वीज केंद्राचे दोन संच बंद करण्यात यश आले. त्याचप्रमाणे नीरीकडून शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी नियोजन आराखडय़ासोबतच कृती आराखडा तयार केला. त्याचाही प्रभावीपणे उपयोग केला. त्यामुळे प्रदूषणात आघाडीवर असलेले चंद्रपूर आता काही प्रमाणात यादीत खाली उतरले आहे.
त्याचाच परिणाम केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी घुग्घुस, ताडाळी, बल्लारपूर व चंद्रपूर या चार क्लस्टरमधील उद्योगबंदी उठविण्यासाठी तत्वत: मान्यता दिलेली आहे. ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळे तेव्हा यासंदर्भातील आदेश निघू शकले नव्हते. मात्र, येत्या ३० मे पर्यंत उद्योगबंदी उठविल्याचे अधिकृत आदेश निघतील, अशी माहिती अहीर यांनी यावेळी दिली.
यानंतर या चारही औद्योगिक क्लस्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात उद्योग येतील. परिणामत: उद्योगांचे विस्तारीकरणही तेवढय़ाच वेगाने होऊन सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध होईल, असेही अहीर म्हणाले. केवळ उद्योगबंदीच नाही तर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा इको सेन्सेटीव्ह झोन जाहीर करण्यासंदर्भात गेल्या दोन वषार्ंपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केंद्रीय वनमंत्री जावडेकर यांच्या कार्यालयात ही फाईल पडलेली आहे. तेव्हा इको सेन्सेटीव्ह झोन तातडीने जाहीर करावा, अशीही मागणी वनमंत्र्यांना करणार असल्याची माहिती अहीर यांनी यावेळी दिली.

उद्योगबंदी मागे घेण्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन -मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्र घुग्घुस, ताडाळी, चंद्रपूर व बल्लारपूर हे क्षेत्र गंभीर प्रदूषित औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करून केंद्र शासनाने २०१० मध्ये उद्योगांचे विस्तारीकरण करण्यास प्रतिबंध घातले होते. याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे ही बंदी ३० मे पर्यंत उठविण्यात येईल, असे आश्वासन जावडेकर यांनी दिले. त्यामुळे जिल्ह्य़ात उद्योगांचे विस्तारीकरण होऊन नवे उद्योग उभारले जातील आणि हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्य़ातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आखल्या जातील, असे पालकमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांना आश्वस्त केले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी याबाबत स्वत: लक्ष घालून जावडेकर यांच्या लक्षात ही बाब आणून देऊन बंदी हटविण्याची विनंती केली.