अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी उपसंचालक जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. पण त्यानंतर गेली सहा महिने ही भरती प्रक्रिया रखडली आहे. परीक्षेची तारीख निश्चित न झाल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका वेळकाढूपणाची आहे असा आरोप परीक्षार्थींकडून केला जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ३० डिसेंबर २०२२ रोजी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून वाद सुरू झाला होता. पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदांसाठी अर्ज करता येत नव्हता. त्यामुळे परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येत नव्हती. मात्र हा वाद मिटूनही गेली सहा महिने परीक्षेची तारीख जाहीर होत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. सन २००७ नंतर ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया होत आहे. गेली पंधरा वर्षे भरती झालेली नाही. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते आहे.