सैनिकाच्या भूतदयेमुळे जखमी गाढव पोहोचले करुणाश्रमात | Loksatta

सैनिकाच्या भूतदयेमुळे जखमी गाढव पोहोचले करुणाश्रमात

पुलगावात गाढवांची संख्या बऱ्यापैकी आहे. येथे गाढवांचा उपयोग वाळू वाहून नेण्यासाठी होतो.

सैनिकाच्या भूतदयेमुळे जखमी गाढव पोहोचले करुणाश्रमात
पुलगावात गाढवांची संख्या बऱ्यापैकी आहे. येथे गाढवांचा उपयोग वाळू वाहून नेण्यासाठी होतो

प्राण्यांना बोलता येत नसले तरी त्यांच्या डोळयातील भाव बरेच काही सांगून जातात. असेच एका गाढवाच्या (राजकुमार) डोळयातील भाव पुलगावमध्ये बदलून आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाने जाणले आणि जखमी झालेल्या राजकुमारला पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात उपचाराकरिता आणण्यात आले.

पुलगावात गाढवांची संख्या बऱ्यापैकी आहे. येथे गाढवांचा उपयोग वाळू वाहून नेण्यासाठी होतो. त्यांचे मालक काम संपल्यावर त्यांना मोकळे सोडून देतात. पुलगावात असे बरेच गाढव उकीरडे फुंकत प्लास्टिक खाताना दिसतात. त्यातील ‘राजकुमार’ नावाचे गाढव एका वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. त्याच्या समोरच्या पायाचे हाड मोडले आणि ते अपंग झाले. उपचार न मिळाल्यामुळे आणि मालकाने सोडून दिल्यामुळे त्याला चालताना त्रास व्हायचा आणि ते जोरात ओरडायचे. चार दिवसांपूर्वी सौरभ सिंग या भारतीय सैन्यातील जवानाची आगरा येथून पुलगाव सीएडी शिबिरात बदली झाली. त्याची नजर जखमी गाढवावर पडली. त्याचा तुटलेला पाय आणि वेदना पाहून त्याच्या मनात दयेचा भाव निर्माण झाला. तो त्याच्या मदतीकरिता प्रयत्न करू लागला. पण सौरभ सिंग यांची शहरात ओळख नसल्यामुळे हे काम त्यांच्यासाठी फार अवघड होते.

पुलगावात कुठूनही मदत न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी थेट दिल्लीत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री आणि पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा मनेका गांधी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या गाढवाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. मनेका गांधी यांनी वध्रेतील पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सचिव आशिष गोस्वामी यांना माहिती दिली. माहिती मिळताच पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सुमित जैन, कौस्तुभ गावंडे, अजिंक्य काळे, मंगेश येनोरकर यांनी पुलगाव येथे जाऊन व सौरभ सिंग यांच्या मदतीने गाढवाचा शोध घेतला. यात मालकासोबत संपर्क साधला असता मालकाने त्या गाढवाची काळजी घेऊ शकत नाही. ते पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या ताब्यात देत असल्याचे मालक राजिक पठाण यांनी लेखी दिले.  शहरातील लोकांच्या मदतीने ‘राजकुमार’चा शोध घेतला. त्याला पकडून पीपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात पुढील उपचाराकरिता आणण्यात आले. भारतीय सैन्यातील जवान मुक्या प्राण्यांच्या मदतीकरिताही योगदान देण्यासाठी तितकेच सक्षम असतात, हे  सौरभ सिंग यांनी या कार्यातून स्पष्ट केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2017 at 05:21 IST
Next Story
रेल्वेतून अपहरणाचा प्रयत्न