नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. मनोज पांडे यांच्यावरील मानसिक आणि आर्थिक छळाच्या आरोप प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे. माजी न्यायाधीश मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ४ चार सदस्यीय चौकशी समितीने साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यात विद्यापीठातील संबंधित अधिकारी आणि तक्रारीशी संबंधित असलेल्या व्यक्तींना बोलावले जात आहे.
विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्राध्यापकाद्वारे ‘आरएसी’मध्ये दोन विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याची तक्रार होती. याबाबत विधिसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी बैठकीत प्रश्नही उपस्थित केला होता. मात्र, या प्रकरणात विद्यापीठाने कुठलेही उत्तर न देता प्राध्यापकाचा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विद्यापीठाने नाईलाजाने माजी न्यायाधीश मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. आता समितीचे कामकाज सुरू करण्यात आले.
त्यानुसार समितीने कामकाजास सुरुवात केली. समितीने मानव्यविज्ञान शाखेच्या अधिष्ठात्यांसह संबंधित व्यक्तींची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यात काहींनी प्रकरणाबाबत न सांगता केवळ प्राध्यापक किती चांगले आहेत, हे सांगितल्याची माहिती नाही. अनेकांचा त्यांच्याशी संबंध नसताना, त्यांनी मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचे दाखले समितीला दिल्याची माहिती आहे. याशिवाय काहींकडून प्राध्यापकांच्या कारनाम्याबाबत सांगितले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.