अमरावती : जिल्हा परिषद मधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी २०२३-२४ की २०२४-२५ ची संचमान्यता गृहीत धरायची? हा पेच अखेर सुटला आहे. शासनाने २०२५ च्या संचमान्यतेनुसार बदल्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान, बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या काही जिल्ह्यात जाहीर झाल्या असल्या तरी काही जिल्हा परिषदांनी बदली पात्र शिक्षकांच्या याद्या मुदत संपल्यावर प्रसिद्ध न केल्याने बदली प्रक्रिया तळ्यात-मळ्यात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया सध्या चांगलीच चर्चेत असून बऱ्याच जिल्ह्यात बदली पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. हजारो शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. मात्र, जागा किती रिक्त होतात, यावरच सर्व काही अवलंबून आहे.
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी राज्यातील काही जिल्हा परिषदांकडून २०२३-२४ ची संचमान्यता गृहित धरली होती, तर काही जिल्ह्यांनी २०२४-२५ ची संचमान्यता विचारात घेऊन प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे आपण नेमकी कोणत्या वर्षाची संचमान्यता विचारात घ्यावी, यावरून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समोर आले होते. त्यामुळे पेच अधिक घट्ट बनला होता. यातून मार्ग काढत काही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते.
यानंतर दुसऱ्याच दिवशी शासनातील वरिष्ठांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसारच बदली प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी बदली प्रक्रियेचा मार्ग आता पुन्हा आडवळणावर आलेला आहे. काही जिल्हा परिषदांनी २४ मे ही बदली पात्र यादी जाहीर करण्याची अंतिम मुदत असल्यावरही आपल्या याद्या अजूनही प्रसिद्ध केलेल्या नसल्याने बदली प्रक्रियेवरच पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संभ्रम दूर व्हावा, अशी शिक्षकांची अपेक्षा आहे.
२५ हजार शिक्षक अतिरिक्त
शासनाकडून शिक्षक भरतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, २०२५ च्या संचमान्यतेनुसार जागा निर्माण होण्याऐवजी आहे ते शिक्षक अतिरिक्त ठरताहेत. अशा शिक्षकांची राज्यातील संख्याही २५ हजाराच्या घरात आहे. हे असे चित्र राहिल्यास शिक्षकांची भरती होणार कशी? त्यामुळेच १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. याबाबत माजी आमदार बच्चू कडू यांचे नेतृत्वात आंदोलन देखील केले आहे.- महेश ठाकरे ,राज्याध्यक्ष , प्रहार शिक्षक संघटना.