नागपूर : नामांकित विमा कंपनीच्या प्रमुखाकडून महिला कर्मचाऱ्याला बडतर्फीची भिती दाखवत शरीरसुखाची मागणी करण्यात आली. त्याने वर्षभराअगोदर विमानात तसेच विदेश दौऱ्यातदेखील लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अवीवा लाइफ इन्शुरन्स कंपनीतील प्रमुख असलेल्या चयन गुप्ता (५०) हा. गुरुग्राम असे आरोपीचे नाव आहे. संबंधित महिला कर्मचारी कार्यालयीन कामामुळे चयन गुप्ताच्या संपर्कात आली. डिसेंबर २०२४ मध्ये ती इतर सहकाऱ्यांसोबत पोर्तुगाल येथे गेली. या दौऱ्यात गुप्ता देखील विमानात तिला शेजारी बसण्यासाठी दबाव टाकत होता. ८ डिसेंबर २०२४ ला लिस्बन येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यावर गुप्ता याने तिला हॉटेलच्या रूमवर बोलविले. मात्र, एकटीने जाणे योग्य न वाटल्याने तिने तेथे जाणे टाळले. १० डिसेंबर ला त्याने परत तिला बोलविले.

गुप्ताने तिला बोलवण्यासाठी मुंबईतील टीमने खोलीवर यावे असा संदेश पाठवला. मात्र, ती इतर तीन सहकाऱ्यांना घेऊन गेली. ते पाहून गुप्ता संतापला व तू एकटी का आली नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने सर्वांना मद्य पाजण्याची ऑफर दिली. महिला तेथे केवळ बसून होती. नागपूरला पोहोचल्यावर तिने वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार घातला.  तक्रारीचा ई-मेलदेखील केला. ३ ऑक्टोबर २०२५ ला कंपनीतील सहकाऱ्याला इन्सेन्टिव्हची मागणी करण्याचा ठपका लावत तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तिने योग्य ती उत्तरे सादर केली. मात्र, नोव्हेंबरमध्ये तिला बडतर्फ करण्यात आले.

काही दिवसांनीच तिला हाँगकाँग दौऱ्यावरदेखील जायचे होते. मात्र, त्याअगोदर तिला बडतर्फीचा ई-मेल मिळाला. त्याच दिवशी गुप्ता याने तिला फोन करत बडतर्फी वापस घेणे शक्य असल्याचे सांगितले. हाँगकाँगला गेल्यावर माझ्यासोबत रात्र घालवावी लागेल, अशी त्याने मागणी केली. त्यानंतर महिलेने पोर्टल येथे तक्रार केली. मात्र, कारवाई झाली नाही. अखेर तिने कामगार न्यायालयात तक्रार केली. तिने अजनी पोलिस ठाण्यातही धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीवरून चयन गुप्ताविरोधात गुन्हा दाखल केला.

मुलाचे हातपाय बांधून लाखोंची रोकड लंपास

नागपूर : समता नगरात एका घरात शिरलेल्या दोन चोरांनी एकटाच बसलेल्या अवघ्या नऊ वर्षीय मुलाला हातपाय बांधून दुसऱ्या खोलीत कोंडले. त्यानंतर कपाटीतील लाखाहून अधिकची रोख  लंपास केली. कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समतानगर येथे रविवारी ही धक्कादायक घटना समोर आली.

खासगी कंत्राटदार असलेले कमलेश मासूरकर (३५) हे समतानगरात राहतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शनिवारी सकाळी ते रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यांचा मोठा मुलगादेखील शाळेत गेला होता. दुपारी नऊ वर्षीय मुलगा व मुलगी दुपारी शाळेतून घरी परत आले. लहान मुलगा घरी एकटाच होता. दुपारनंतर दोन चोर तोंडावर मास्क बांधून आत शिरले व त्यांनी लहान मुलाचे हातपाय बांधून त्याला एका खोलीत कोंडले. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या खोलीतील १ कपाटात ठेवलेले लाख ०५ हजारांची रोख रक्कम लंपास केली. काही वेळाने कमलेश घरी पोहोचले असता त्यांना मुलगा कोंडून बांधलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.