scorecardresearch

चंद्रपूर: हजारावर पंचनाम्यामध्ये फेरबदल, पीक विमा कंपनीचे पितळ उघड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना विमा कंपनीने अफरातफर केल्याचे निदर्शनास आले आहे.

insurance
हजारावर पंचनाम्यामध्ये फेरबदल, पीक विमा कंपनीचे पितळ उघड

नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना विमा कंपनीने अफरातफर केल्याचे निदर्शनास आले आहे. विमा कंपनीने सहा तालुक्यातील एक हजार १११ पंचनाम्यामध्ये फेरबदल केल्याचे उघडकीस आल्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा बैठक घेऊन याबाबत त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले. यामुळे पीक विमा कंपनीचा मनमर्जी कारभार समोर आला आहे.

हेही वाचा >>>नागपूर: उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर ठेवला बॉम्ब?पोलीस नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे तर तालुकास्तरावरून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी हे संबंधित शेतकऱ्यांसमोर पिकांचे पंचनामे करीत असतात. मात्र, विमा कंपनीने शेतकऱ्यांसमोर केलेल्या पंचनाम्यात अफरातफर केल्याचे समोर आले आहे. यात मूळ पंचनाम्यात खोडतोड, बनावट स्वाक्षरी, आकड्यांमध्ये तफावत, वेगळे शिक्के, बनावट झेरॉक्स असे प्रकार काही तालुक्यांमध्ये आढळून आले आहेत. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देताच कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा मुख्यालयी माहिती सादर करावी, जेणेकरून विमा कंपनीकडून मूळ पंचनाम्याची प्रत उपलब्ध करणे सोपे होईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>चिंता वाढली.. नागपुरात पुन्हा सक्रिय करोनाग्रस्त अर्धशतकाकडे! २४ तासांत आढळले इतके रुग्ण?

जिल्ह्यात आतापर्यंत सहा तालुक्यातील एक हजार १११ पंचनाम्यामध्ये तफावत आढळून आली असून यात सर्वाधिक वरोरा तालुक्यात ८२२ प्रकरणे, चिमूर १६२, पोंभुर्णा ६०, गोंडपिपरी ३७, चंद्रपूर २५ आणि सावली येथील ५ प्रकरणांचा समावेश आहे. काही तालुक्यांचा अहवाल अप्राप्त असून त्यांनी तातडीने अहवाल सादर करावा, इतर तालुक्यातील अहवाल निरंक असला तरी तेथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

पीक विमा कंपन्यांवर वचक नाही!
नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशावेळी पिकांचा विमा असलेले शेतकरी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवतात. मात्र, कंपनीचे अधिकारी शेतावर वेळेत पोहोचत नाही. तसेच क्षुल्लक कारण देऊन पीकविमा नामंजूर करीत असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही, असा आरोप होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 14:45 IST

संबंधित बातम्या