नागपूर: राज्यात अपघात नियंत्रणासाठी १ हजार ९६७ किलोमिटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर ७६८.६९ कोटी रुपयांतून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) उभारली जाणार आहे. त्यात मुंबई, पुणे, नागपूर विभागातील राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी सध्याची शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे शासनाने मुंबई, पुणे, नागपूर विभागातील राष्ट्रीय महामार्गावर आटीएमएस प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मुंबई विभागातील ठाणे- आच्छाड, मुंबई- कोल्हापूर (कागल), नाशिक- धुळे (हाडाखेड) या ७२६ किलोमिटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे.

पुणे विभागातील पुणे- सोलापूर, पुणे- नाशिक, पुणे- छत्रपती संभाजीनगर अशा एकूण ७७६ किलोमिटर मार्ग आणि नागपूर विभागातील नागपूर- अकोला, नागपूर- चंद्रपूर, नागपूर- देवरी दरम्यान ४६६ किलोमिटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. या मार्गावर वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टाळता यावेत या उद्देशाने ही प्रणाली लावली जाणार आहे. या मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लागणार असून वाहनांचा वेग तपासणारी ‘ॲव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ही असेल. अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शोधणारी ‘लेन डिसिप्लीन व्हयोलेशन डिटेक्शन सिस्टीम’ही बसवण्यात येणार आहे.

‘आयटीएमएस’ प्रणालीचा फायदा काय ? 

द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने येथे अत्याधुनिक अशी आयटीएमएस (इंटेलिजंट मॅनेजमेंट ट्रॅफिक सिस्टीम) ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावर वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टाळता यावेत या उद्देशाने वाहतूक नियमन करण्यासाठी, अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोचवण्यासाठी तसेच टोलवसुली जलद, अचूक तसेच पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशी ही यंत्रणा आहे.

सौर व पारंपरिक ऊर्जेचा वापर

आयटीएमएस प्रकल्पासाठी अंदाजे ७८६.६९ कोटी रुपयांच्या खर्चापैकी २३२.१ कोटी रुपये कॅपेक्स, ५२४.५९ कोटी रुपये ओपेक्स आणि ३० कोटी रुपये वीज जोडणीवर खर्च होतील. या महामार्गावरील ब्लॅक स्पाॅटवर वीज पुरवठ्यासाठी सौर आणि पारंपरिक ऊर्जेचाही वापर केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवहन आयुक्त कार्यालयाचे म्हणणे काय ?

“नऊ राष्ट्रीय महामार्गावर आयटीएमएस प्रणाली उभारण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रणालीमुळे ११ प्रकारचे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांना स्वयंचलित पद्धतीने चालान केले जाईल. त्यातून नागरिकांना वाहतूक शिस्त लागून अपघातावर नियंत्रण मिळणे शक्य होईल.” – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.