नागपूर : राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. आज , मंगळवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तापमानाची स्थिती काय?
पावसाच्या उघडिपीनंतर कमाल तापमानात वाढ-घट होत आहे. सोमवारी, १६ सप्टेंबरला सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस सरासरीपेक्षा अधिक होऊनही तापमानात मात्र वाढ झालेली दिसून येत आहे.
हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…
पाऊस कुठे ?
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज मंगळवारी १७ सप्टेंबरला राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याने अनंत चतुर्दशीला पाऊस राहणार नाही असा अंदाज दिला होता, मात्र बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावरण आहे. नागपुरात देखील पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
गणपती विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट
विदर्भात अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच आभाळी वातावरण आहे. पहाटेपासूनच सगळीकडे जोरदार वारे वाहत होते. तर उजाडल्यावर आकाशात काळ्या ढगांची गर्दी दिसून आली. दिवसभर आज अनेक ठिकाणी हेच वातावरण कायम आहे. विसर्जन मिरवणुकीला साधारण सायंकाळी चार वाजेनंतर सुरुवात होते. हवामानाची स्थिती पाहता पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा >>>गडचिरोली जिल्हा खनिज निधीवर नागपुरातील आमदारांचा डोळा?; जिल्हाबाहेरील कंत्राटदारांची रेलचेल वाढली
वादळी प्रणालीची स्थिती काय ?
दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर वादळी प्रणाली सक्रिय आहे. सोमवारी, १६ सप्टेंबरला ही प्रणाली पुरुलियाच्या आग्नेयेकडे ४० किलोमीटर, बंकुरापासून ११० किलोमीटर नैॡत्येकडे, झारखंडच्या जमशेदपूरपासून ६० किलोमीटर, तर रांची पासून १४० किलोमीटर पूर्वेकडे होती. ही प्रणाली झारखंड, छत्तीसगडकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसर, रोहतक, शाहजहानपूर, लखनऊ, दल्तोंगंज, वादळी प्रणालीचे केंद्र (डीप डिप्रेशन) ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते.