अकोला : आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकाचा थरार महाराष्ट्राच्या विविध भागातील आकाशात आज, ६ जुलैपासून सलग चार दिवस अनुभवता येणार आहे. अवकाशातील अंतराळ संशोधन स्थानकाचे दर्शन खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारे एक मोठे अंतराळ स्थानक असून हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. अंतराळवीरांसाठी निवासस्थान आणि संशोधन प्रयोगशाळा म्हणून काम करणारे हे स्थानक अंतराळात पाठवलेले सर्वात मोठे स्थानक आहे. आकाशातील महाकाय आकाराचे हे अंतराळ संशोधन स्थानक जगातील सर्वात महाग वास्तू असून त्याची उभारणी अनेक टप्प्यात केली. सुमारे ४६० टन वजन व या ठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण असल्याने ते हवेत तरंगते. दरताशी सुमारे २८ हजार किलोमीटर वेगाने हे एक पृथ्वी प्रदक्षिणा दीड तासात या प्रमाणे रोज पंधरा ते सोळा वेळा पृथ्वी भोवती फिरते.
इस्रोचे शुभांशू शूक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकात जाऊन आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. भविष्यासाठी तसेच आगामी गगनयान, भारतीय अंतराळ स्थानक उभारणी व भारतीय मानवाचे चंद्रावतरण या संदर्भात हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. त्यांचे चौदा दिवसाचे शून्य गुरुत्वाकर्षण क्षेत्रात वास्तव्य आणि विविध प्रयोगांचे संशोधन आगामी काळात दिशादर्शक ठरू शकेल, असे प्रभाकर दोड म्हणाले.
महाकाय आकाराचे हे अंतराळ संशोधन स्थानक ज्या भागातून जाते, तेव्हा ते त्या भागात रात्री नुसत्या डोळ्यांनी पाहता येते. हे स्थानक महाराष्ट्राच्या आकाशात चार दिवस नुसत्या डोळ्यांनी फिरत्या चांदणीच्या स्वरूपात पाहता येईल. दि. ६ ते १० जुलैदरम्यान स्थानकाचे आकाशात दर्शन घडणार आहे. ६ रोजी सायंकाळी ७.५९ ते ८.०५ दरम्यान दक्षिण ते पूर्व दिशेला, ७ ला रात्री ८.४७ ते ८.५३ पश्चिम ते उत्तर दिशेला, ८ रोजी रात्री ७.५८ ते ८.०४ वाजता नैऋत्य ते ईशान्य दिशेला आणि १० जुलैला पहाटे ५ ते ५.०६ वाजता वायव्य ते आग्नेय दिशेला दर्शन होईल.
यामध्ये दि.८ व १० या दिवशीची उंची व तेजस्विता अधिक असून हे स्थानक ज्या दिशेला असेल तो भाग निरभ्र असावा. या अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.