नागपूर : ज्यांच्या आशीर्वादामुळे डॉ. सुभाष चौधरी यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली त्याच संघ परिवारातील एक गट सध्या उन्हाळी परीक्षांवरून कुलगुरूंनाच अडचणीत आणण्यासाठी सक्रिय असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे. परीक्षेचे स्वरूप, नियोजन, वेळेत निकाल या कारणांवरून कुलगुरूंसमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी उन्हाळी परीक्षा ऑफलाईन  घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा कधी व कुठल्या स्वरूपात होणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी सारेच चिंतेत असताना केवळ अंतर्गत राजकारणामुळे परीक्षेचा निर्णय रखडल्याचे बोलले जात आहे. संघ परिवाराच्या आशीर्वादाने डॉ. चौधरी कुलगुरू पदावर विराजमान झाले असले तरी ते केवळ ‘बहूजन’ असल्याने परीक्षेवरून त्यांना गोवण्याचा उच्चस्तरीय डाव असल्याही चर्चा विद्यापीठात सुरू आहे. सुरुवातीला कुलगुरूंवर ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे विद्यापीठाने तसा निर्णयही घेतला. मात्र मध्यंतरी उच्च शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ऑफलाईन परीक्षेच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर तरी विद्यापीठाने परीक्षेबाबत निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अद्यापही परीक्षेचा निर्णय जाहीर न झाल्याने या विषयासंदर्भात विद्यापीठ वर्तुळातील तज्ज्ञांनी चर्चा केली असता कुलगुरूंच्या नजिकचाच एक गट परीक्षेचा निर्णयावरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली. परीक्षा आणि निकाल नियोजित वेळेत न झाल्यास एका दबाव गटाच्या माध्यमातून कुलगुरू कसे अपयशी आहेत, हे दाखवण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.  विद्यापीठाच्या अंतर्गत राजकारणात कुलगुरूंना गुंतवून या पदावर बहुजन समाजातील व्यक्ती कशी अपयशी ठरले हे दाखवण्याचा डाव रचला जात असल्याची माहिती शैक्षणिक वर्तुळातील एका ज्येष्ठ व्यक्तीने दिली.

परीक्षेबाबत आज निर्णय?

विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात बुधवारी बैठक घेण्यात येणार असून परीक्षेचे स्वरूप आणि वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परीक्षा ऑफलाईनच होणार असून जूनच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचा व १५ जुलैपर्यंत अंतिम वर्षांच्या परीक्षा संपवण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

कोंडी करण्यासाठी अशीही मोर्चेबांधणी

पीएच.डी. विद्यार्थिनींचे छळ प्रकरण आणि त्यानंतर विधिसभेमध्ये झालेल्या गोंधळामध्येही संघ परिवारातील एक गट थेट कुलगुरूंच्या विरोधात गेला. विधिसभेवरून कुलगुरूंची तक्रार थेट राज्यपालांकडे करण्यातही त्यांचा पुढाकार होता. कुलगुरूंच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही संघ परिवारातील एका बडय़ा नेत्याने केली होती. कुलगुरूंची कोंडी करण्यासाठीच मोर्चेबांधणीचा हा एक भाग असल्याचेही आता बोलले जात आहे.

आमची मागणी ऑफलाईन परीक्षा घ्यावी हीच आहे. मात्र, कुलगुरूंनी परीक्षेबाबत काहीतरी निर्णय घेणे अपेक्षित आहे. आम्ही कुलगुरूंना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात नसून त्यांनी परीक्षेबाबत कुठलातरी एक निर्णय घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.

– विष्णू चांगदे, सदस्य, व्यवस्थापन परिषद.