लोकसत्ता टीम
भंडारा : सेवकराम पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरदोली(सि.) व सीमा देवी पारधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर या औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोगस असल्याचा आरोप करीत या विरूद्ध ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे प्रादेशिक कार्यालय,नागपूर येथील व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्या संयुक्त पाच सदस्यीय चमूने आकस्मिक भेट देऊन पाहणी व चौकशी केली. या दरम्यान अनेक आक्षेपार्ह बाबींची नोंद या पथकातील सदस्यांनी केल्याची माहिती एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी दिली आहे.
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विजय लाकडे यांची भेट घेऊन तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांना ईमेलद्वारे निवेदन दिले होते. या भेटीदरम्यान येथील संस्थेतील गैरप्रकाराबद्दल माहिती दिली होती. त्यावर संचालकांनी लवकरच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची चमू पाठवून अहवाल मागविण्याचे आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले, तर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी ही चमू तुमसरात पोहोचली.
या पाच सदस्यीय समितीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांसह विषयांचे तज्ञ अधिकाऱ्याचा समावेश होता. त्यांनी संस्थेत जाऊन दस्तऐवजाची तसेच इमारत व वर्कशॉपची पाहणी केली. या दरम्यान काही महत्त्वाच्या नोंदीही समितीने घेतल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता सर्व व्यवस्थित असल्याचे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्थेने दबाब आणल्याचे चमूच्या निदर्शनास आल्याचे चोपकर यांनी सांगितले.
समितीमधील एका सदस्याने आपले नाव उघड न करण्याचा अटीवर, या पाहणीत अनेक आक्षेपार्ह आणि नियमबाह्य बाबी आढळल्याची नोंद घेतल्याचे सांगितले. समितीकडून हा अहवाल महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे सादर केला जाईल. त्यावर संचालनालय पुढील निर्णय घेईल, असे सांगण्यात आले.