चंद्रपूर: बँक संचालकांच्या घरातील नोकरापासून तर बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांची मुल, नातेवाईकांची निवड झाल्याचे कागदोपत्री सबळ पुराव्यांसोबतच नोकरीसाठी काही संचालकांनी उमेदवारांच्या वडीलांची नावावर केलेली शेतजमिन, आर्थिक देवाण घेवाणीचे संभाषण अशी बरीच माहिती तक्रारकर्त्यांनी तीन सदस्यीय चौकशी पथकाकडे सादर केल्याने संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. दरम्यान बँकेचे अधिकारी, अध्यक्ष तथा काही संचालक मंडळ निवडणुकीच्या कामानिमित्त नागपुरा गेले असल्याने तसेच काही तक्रारदार बाहेरगावी असल्याने त्यांचे म्हणणे नोंदवून घेण्यासाठी चौकशी पथक पुढील आठवड्यात पून्हा बँकेत धडकणार असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ (लिपीक- २६१ आणि-९१ ) पदांची नोकर भरतीची चौकशी करण्यासाठी भंडाऱ्याचे जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांच्या नेतृत्वात तीन सदस्यांचे पथक जिल्हा बँकेत दाखल झाले होते. या पथकाकडे भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे, मनसेचे राजु कुकडे तथा शिवसेा शिंदे गटाचे मुकेश जिवतोडे यांच्यासह अनेक तक्रारकर्त्यांनी नोकर भरतीत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे सादर केले. शिंदे शिवसेनेचे जिवतोडे यांनी तर उमेदवार आणि संचालक यांच्यात नोकर भरती दरम्यान झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीच्या संभाषणाचे पुरावे असणारा पेन ड्राईव्ह या पथकाकडे सोपविला. विशेष म्हणजे काही संचालकांच्या घरी काम करणारा नोकर बॅंकेत नोकरीवर लागला आहे. ज्यांना रोख रक्कम देणे शक्य नव्हते. अशांकडून काही संचालकांनी शेतजमीन नावावर लिहूल घेतल्याचे पुरावे या पथकाकडे दिले अशी माहिती मुकेश जीवतोडे यांनी दिली. आरक्षण बचाव संघर्ष समितीने राज्यातील काही जिल्हा बॅंकेतील आरक्षण विरहीत नोकर भरती कशी रद्द करण्यात आली, याचे कागदपत्र या पथकाकडे सादर केले. याशिवाय आयटीआय कंपनीने परिक्षार्थ्यांच्या गुणांमध्ये केलेली हेराफेरी, मुलाखती दरम्यान झालेल्या गैरव्यवहार आणि निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दर्शविणारे कागदपत्र बोगस असल्याचे चौकशी पथकाच्या निदर्शनास आणून दिले आहेत.
बॅंकेतील कर्मचारी, अधिकारी आणि संचालकांचे नातेवाईक पैशाच्या जोरावर बॅंकेत नोकरीवर लागले, असा दावा आरक्षण बचाव संघर्ष समितीचे पोतराजे व कुकडे यांनी चौकशी पथकाकडे केला. तसेच नावांची यादीही या पथकाकडे दिली. यामध्ये सारंग जयकृष्ण तिजारे, प्रतीक रामभान बोधले, कु. मोहिनी मुकुंदा कुबे, स्वप्नील दिलीप येरोजवार,कु. पुजा विजय बावणे, मो. राउफ मो. शरीफ शेख, कुणाल सुनील रघाताटे, लोकेश राजेश डॉगरवार, गोपाल विलास सातपुते. स्वप्नील रमेश अडबाले, यशवंत राजेशसिंग चौहान, काजल वैभव दिवे, अमोल शेरकी, स्नेहल रवींद्र ताजणे, राहुल श्याम गरडे. शिल्पा नत्धुजी बेलेकर, कु. रूपाली सुधाकर पोडे, मनीष प्रभू सूर्यवंशी, प्रणय दत्तात्रय वाढई, दीक्षा मरोहर चन्ने. अंकित विठ्ठल जोगी, तुषार सत्यपाल मस्की, ओमकार संजय शास्त्रकार, आकांक्षा नरेंद्र ताजणे. स्वप्नील केशवराव बाजगामे, तन्मय विजय बोरीकर. विशाल विजय खंगार, धनंजय ताराचंद निखाडे, आनंद अशोक पवार, मयूर रवींद्र संभाणी, ताराचंड धनंजय, निखाडे,स्वप्नील केशव दाजगावे यांचा समावेश आहे. दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने चौकशी पथकाची भेट घेतली असता, बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर काही संचालक निवडणुकीच्या कामानिमित्ताने नागपुरला गेले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे जाणून घेता आले नाही. तसेच काही तक्रारकर्ते इतरत्र गेले असल्याने त्यांचे देखील येणे झाले नाही. त्यामुळे चौकशी पथक पुढील आठवड्यात पून्हा बँकेत दाखल होणार आहे. तर काही तक्रारकर्त्यांनी संचालक आणि बॅंकेत निवड झालेल्या उमेदवारांच्या वडिलांच्या बॅंक खात्यांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.