scorecardresearch

दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

“दिशा सालियन प्रकरणाची मुंबई…,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
देवेंद्र फडणवीस ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

दिवगंत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘AU’संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे, असा आहे, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत मुद्दा उपस्थित चौकशीची मागणी केली होती.

राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली.

त्यानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. “दिशा सालियनचे प्रकरणत मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल,” अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केली आहे.

“दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कधीच सीबीआयकडे नव्हती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे नाही, असं सांगितलं. त्यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही आहे. याबाबत जे काही पुरावे मांडले जात आहेत, त्याच्या आधारावर कोणताही राजकीय आकस न ठेवता, निपक्षपणे चौकशी करण्यात येईल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 14:13 IST

संबंधित बातम्या