लोकसत्ता टीम
नागपूर: परिवहन खात्यातून निवृत्त झालेले लक्ष्मण खाडे यांनी नुकतीच नागपूरला भेट दिली होती. यादरम्यान, रामदासपेठेतील त्यांच्या हॉटेलच्या खोलीत पूर्व विदर्भातील आरटीओ अधिकाऱ्यांनी गर्दी केली. ही गर्दी बदल्यांसाठी मोर्चेबांधणीची होती, याबाबतचे वृत्त लोकसत्ताने पुढे आणले होते. परंतु, या प्रकरणात कुणाचीही तक्रार नसतानाही शहर पोलिसांनी एसआयटीकडून चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण लवकर निस्तारण्यासाठी मोठ्या राजकीय नेत्याच्या दबावात ही चौकशी आहे की इतर काही कारणामुळे याची चर्चा आता रंगली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार शनिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, रामदासपेठच्या एका हॉटेलमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली. हा गैरप्रकार असल्याने सायबर विभाग, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा या तिन्ही शाखेतील प्रत्येकी एक सदस्य असलेल्या समितीकडून चौकशी सुरू केली गेली. पोलिसांकडून हॉटेलच्या परिसरापासून खोली पर्यंतचे सगळे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले. आतापर्यंत सहा आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणने नोंदवण्यात आले आहे. इतरही अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल.
आणखी वाचा- महाराष्ट्र, मध्यप्रदेशात वाळू तस्करांचे तर गुजरातमध्ये दारू माफियांचे सरकार: नाना पटोले
पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असल्याचेही अमितेश कुमार म्हणाले. दरम्यान नागपुरातील परिवहन खात्यांच्या विविध व्हट्सॲप समूहांवर ८ मार्चला अचानक पूर्व विदर्भातील काही अधिकाऱ्यांच्या नावाच्या याद्या फिरू लागल्या होत्या. यादीतील अधिकाऱ्यांना रामदासपेठच्या एका हॉटेलमध्ये बोलावले असून तेथे निवृत्त अधिकाऱ्यासोबत चर्चा पूर्ण झाल्यावर आवडीच्या ठिकाणी बदल्यांबाबत दावे केले जात होते. या निवृत्त अधिकाऱ्यासोबत कल्याण आरटीओतील एक अधिकारी व नागपूर आरटीओतील महिला अधिकारीही असल्याचे नमुद होते.
कल्याण आणि नागपूरचे आरटीओ अधिकारीच निवृत्त अधिकाऱ्याला भेटण्याची पास मिळवून देत असल्याचेही समाज माध्यमांवर फिरत होते. हा प्रकार लोकसत्ताने पुढे आणला होता. परंतु पोलिसांकडे याबाबत कुणीही तक्रार केली नाही. त्यानंतरही एसआयटी तयार करून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने आरटीओ आणि पोलीस खात्यात विविध चर्चा रंगल्याचे दिसत आहे.
