scorecardresearch

समृद्धीच्या मोबदल्यातून ‘गुंतवणूक’; उधळपट्टीच्या वाईट अनुभवानंतर सामुदायिक शहाणपण वाढले

सरकारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीपोटी मिळालेल्या बक्कळ रकमेचा दुरुपयोग न करता तिचा सदुपयोग करण्याची कल समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने दिसून आली आहे.

गाडय़ा-बंगल्याऐवजी शेतजमीन खरेदीला प्राधान्य
नागपूर : सरकारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीपोटी मिळालेल्या बक्कळ रकमेचा दुरुपयोग न करता तिचा सदुपयोग करण्याची कल समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने दिसून आली आहे. मोबदल्याच्या रकमेतून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी नव्याने शेती घेणे, दीर्घकाळासाठी बचत करणे आणि कर्ज फेडून कर्जमुक्त होणे आदी पर्याय स्वीकारले आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन देणाऱ्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केल्यावर ही बाब स्पष्ट झाली.
प्रकल्प कुठलाही असो, प्रकल्पबाधितांकडून त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा दुरुपयोगच होतो, असे यापूर्वी नागपूरच्या मिहान प्रकल्पासह विदर्भ, मराठवाडय़ातील इतरही प्रकल्पांबाधितांच्या वाताहतीतून दिसून आले. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी मिळणाऱ्या पाचपट मोबदल्याचे शेतकरी काय करतात हे पाहणे उत्सुकतेचे होते. मात्र या वेळी त्यांनी विचारपूर्वक नियोजन करून स्वत:ची समृद्धी साधल्याचे दिसून आले.
औरंगाबाद व जालना या दोन्ही जिल्ह्यांत शेतकऱ्यांना मिळालेल्या मोबदल्यामुळे जमिनीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली. औरंगाबादजवळ राहणारे बाळासाहेब काळे म्हणाले, आम्ही ‘डीएमआयसी’मधील शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम आणि त्यांची वाताहत अनुभवली होती. त्यामुळे पैसा आल्यावर गाडी, बंगला असा पैसा खर्च केला नाही. अडीच एकर जमिन गेल्यानंतर सात एकर जमीन घेतली. आता सीताफळ, आंबा यांची फळबाग लागवड केली. याच पैशातून बाटलीबंद पाण्याचा प्रकल्प सुरू केला. जालना जिल्ह्यातील नंदगावचे सरपंच दत्तात्रय चव्हाण यांची जमीन समृद्धीमध्ये गेली. गावातील ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी नव्याने शेती घेतली. गावातील लक्ष्मण उबाळे हे दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचे. त्यांनी चांगला पोत असणारी पाच एकर जमीन घेतली. द्राक्षबाग लावली. समृद्धी महामार्गातून मिळालेल्या रकमेतून व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण तसे एखादा टक्काच आहे.
वर्धा जिल्ह्यातून समृद्धीच्या ४२ कि.मी.च्या टप्प्यासाठी कोरडवाहू व ओलिताची शेतजमीन घेण्यात आली. मिळालेल्या मोबदल्यामुळे कित्येक गावे करोडपती झाली. महाबळा ईटाळातील ३२ शेतकऱ्यांना १२० कोटी मिळाले. पैशाचा दुरुपयोग होण्याची भीती व्यक्त झाली. मात्र ती निराधार ठरवत शेतकऱ्यांनी योग्य गुंतवणुकीचा मार्ग पत्करला. महाबळा येथील गंगाधर मुडे यांची बरीच जमीन गेली. त्यांनी आलेल्या पैशातून स्वत: २३ एकर व लहान भावासाठी १८ एकर शेतजमीन विकत घेतली. ते म्हणतात, मोठय़ा प्रमाणात पैसा आला; पण हाच पैसा आयुष्यभराची पुंजी असल्याने भान ठेवून व्यवहार केले. घसघशीत मोबदला मिळालेले भाजपच्या किसान मोर्चाचे नेते प्रशांत इंगळे तिगावकर म्हणाले, एक- दोन निरक्षर शेतकरी वगळता अनेक शेतकऱ्यांनी पैशांचा सांभाळून विनियोग केला. मी स्वत: सर्व कर्ज फेडून उर्वरित रकमेची दीर्घ काळासाठी बचत साधली. एक-दोनच शेतकऱ्यांनी व्यसनात पैसा उडवला. पैसा कुटुंबात वाद निर्माण करणारा ठरल्याचीही काही उदाहरणे आहेत. मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये ९५ टक्क्यांनी योग्य गुंतवणूक केल्याचे चित्र वर्धेत पाहायला मिळते.
अमरावतीतील अनेक शेतकऱ्यांनी घरबांधणी, सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद, गृहबांधणी प्रकल्पांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याकडे अनेकांचचा कल दिसून आलो. जिल्ह्यात शेतजमीन मिळत नाही, त्यामुळे ती घेण्यासाठी शेतकरी पायपीट करीत आहेत. हातची जमीन गेली, नवीन उत्पन्नाचे स्रोत नाही. मोबदल्याचे पैसे बँकेत ठेवल्यावर किती पैसे मिळतील याचे हिशेब लावले जात आहेत. वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश अल्प व मध्यम भूधारकांच्या जमिनी महामार्गात गेल्याने ते भूमिहीन झाले, त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे.

जमिनीचे तुकडे पडल्याचे दु:ख: औरंगाबादच्या टोमॅटो पिकवणाऱ्या गावात मात्र समृद्धीमध्ये जमीन गेल्यानंतरच दु:खच अधिक. कारण पाकिस्तानला टोमॅटो पुरवणारी ही मंडळी जमीन गेल्याने आणि त्याचे तुकडे झाल्याने नाराज आहे. ‘समृद्धी’ महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यापुरता ‘पुढच्यास ठेच..’ या म्हणीप्रमाणे होत असल्याचे दिसून येत आहे. वाशीम जिल्ह्यातही महामार्गामधून गेल्याने शेत दोन तुकडय़ांत विभागले. रेडीरेकनरचे दर वाढल्याने कुणी त्या तुकडय़ातील जमिनी घेण्यास तयार नाहीत. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी कोंडीत सापडला आहे.
वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात मोजकेच प्रकल्पबाधित ‘समृद्ध’
वाशीम जिल्ह्यात मोजकेच समृद्ध वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात मोजकेच प्रकल्पबाधित आर्थिकदृष्टय़ा ‘समृद्ध’ झाले, तर अल्पभूधारक भूमिहीन झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी भौतिक सुख-सुविधेवर पैसा खर्च केला. त्यामुळे जमीन गेली अन् पैसाही गेला, समृद्धी महामार्गातून निवडक शेतकरीच आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाले, असे मंगळुरपीरचे सामाजिक कार्यकर्ते सचिन कुळकर्णी म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investment exchange prosperity community wisdom experience waste preference purchase agricultural land instead cars bungalows amy

ताज्या बातम्या