राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) त्यांचा स्वातंत्र्यलढय़ात सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी चिमूर सत्याग्रहाचा आधार घेतला असून या लढय़ात शहीद झालेले बालाजी रायपूरकर हे संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा केला आहे. परंतु, बालाजी शहीद झाल्याचा जो काळ सांगितला जात आहे त्यावेळी त्यांचे वय केवळ १३-१४ वर्षांचे होते, असे आता स्पष्ट होत असून त्यावेळी संघाने एका बालकाला सत्याग्रहात उतरवले होते काय, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

आपला स्वातंत्र्यलढय़ात सहभाग होता हे दर्शवण्यासाठी संघाने गेल्या काही दिवसांपासून नियोजनपूर्वक प्रचार मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी इतिहासातले नवनवीन दाखले दिले जात आहेत. परंतु, इतिहासाचे अभ्यासक मात्र संघाचे हे दावे खोडून काढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासाच्या पदव्युत्तर विभागाचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरेटी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, चिमूर-आष्टीच्या सत्याग्रहात एखाद्याचा वैयक्तिक सहभाग असू शकेल, पण ते संघाचेच लोक होते हे सिद्ध करणे कठीण आहे.

बालाजी रायपूरकर आमचे स्वयंसेवक होते, असा दावा संघ करीत आहे त्या बालाजींच्या कुटुंबात देखील त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी कोणीही नाही. त्यांच्याकडे देखील बालाजींबाबत ऐकीवच माहिती आहे. बालाजी यांच्या थोरल्या बंधूंचे चिरंजीव मनोहर रायपूरकर हे उमरेड येथे राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, बालाजी हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील एका शाळेत शिक्षण घेत होते. नागपंचमीला सुटी असल्याने ते आपल्या मूळ गावी चिमूरला आले होते. त्याच दिवशी गावात सकाळी मिरवणूक निघाली. त्यात ते देखील सहभागी झाल्याचे माझ्या आईने मला एकदा सांगितले होते. ही घटना घडली तेव्हा माझे वय केवळ १० महिन्यांचे होते. बालाजी शहीद झाले तेव्हा त्यांचे वय काय असेल असे विचारले असता ते म्हणाले, मला बालपणी एक शालेय पुस्तक घरी सापडले होते. ते बालाजी यांचे असल्याचे नंतर मला आईकडून कळले. त्यावरून ते इयत्ता सातवीत असावे आणि त्यांचे वय १३ ते १४ असावे, असे वाटते. परंतु, त्यांच्या जन्माचा कोणताही अधिकृत पुरावा आम्हा कुटुंबीयांकडे नाही. याच मनोहर रायपूरकर यांचे लहान बंधू चंद्रशेखर नागपूरला राहतात. ते म्हणाले, चिमूरला आमच्या घराशेजारी ब्राह्मण समाजाची घरे होती. जवळच संघाची शाखा भरत होती. त्यावेळी आजूबाजूची मुले शाखेत जायची. आमच्या कुटुंबातील काही मुले देखील शाखेत जात होती. तसेच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाला गावातील मंडळीप्रमाणे आमच्या कुटुंबातील लोकही जायचे, असे ते म्हणाले. परंतु, त्यांनीदेखील बालाजी संघ स्वयंसेवक असल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतीही ठोस माहिती दिली नाही.

याबाबत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘संदीप पाटील हे तुमच्याशी बोलतील’, असे कळवले. संदीप पाटलांशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, ‘संघाचे निवेदन योग्यच आहे. संघ जे साहित्य प्रसिद्धीसाठी देते, ते अधिकृतच असते’. परंतु, ‘लोकसत्ता’ने आग्रह धरल्यानंतर त्यांनी त्यांचे निवेदन त्यांच्या अधिकृत ई-मेलने ‘लोकसत्ता’ला पाठवले. पण, निवेदनात उल्लेख असलेल्या आंदोलनात संघाचा सहभाग होता, याचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत.

भारत छोडो चळवळीत संघाने भाग घेतला नव्हता. या चळवळीपासून ते दूर होते आणि त्यांची भूमिका ब्रिटिश सरकारच्या समर्थनाची होती. त्यामुळे संघाने चिमूरच्या सत्याग्रहात भाग घेतला असे म्हणणे धाडसाचे होईल. चिमूर-आष्टी सत्याग्रहातील संघाच्या सहभागाचा कोणताही पुरावा आजवर मला सापडला नाही. 

– धीरेन झा, संघाच्या कार्यप्रणालीचे अभ्यासक, लेखक

 राजपत्रात काय?

संघ स्वातंत्र्यलढय़ातील आपला सहभाग सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे. या क्रमात संघाने यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील जंगल सत्याग्रहात हेडगेवारांचा समावेश असल्याचे निवदेन प्रसिद्ध केले होते. याबाबतचे तथ्य ‘लोकसत्ता’ने तपासले असता काही धक्कादायक माहिती समोर आली.  ब्रिटिश सरकारविरुद्ध १६ ऑगस्ट १९४२ ला सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात बालाजी रायपूरकर सहभागी होते, असे नमूद आहे. मात्र, यामध्ये ते संघाचे स्वयंसेवक असल्याचा उल्लेख नाही. तसेच त्यांच्या वयाचा पुरावा देखील उपलब्ध नाही.

मुद्दा काय?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संघाच्या विश्व संवाद केंद्राने ‘आरएसएस अ‍ॅण्ड फ्रीडम स्ट्रगल’ या नावाने निवेदन काढले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढय़ात संघाचे स्वयंसेवक सहभागी होते, असा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी शहीद बालाजी रायपूरकरांचा संदर्भ दिला आहे. परंतु, त्या दाव्याबाबत संघाकडून कुठलाही ऐतिहासिक पुरावा दिला गेलेला नाही.

इतिहासात नमूद.. महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात (गॅझेटीअर्स)मधील ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील चांदा, प्रकरण दोन, पान क्रमांक १३१ वर बालाजी रायपूरकर या तरुण मुलाचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. परंतु, ते राष्ट्रीय दलाचे असल्याचे नमूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Involvement freedom struggle information historical evidence faced new facts ysh
First published on: 12-08-2022 at 00:02 IST