नागपूर: ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथे गेलेले महाराष्ट्रातील सुमारे एक लाख मुस्लिम बांधव इराण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखाती देशांतील हवाई सेवा विस्कळीत झाली असून, अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. परिणामी हजारो भाविकांचे मायदेशी परतणे अनिश्चित झाले आहे.
हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची अधिकृत नोंदणी केंद्र सरकारकडे असते; मात्र ‘उमरा’साठी जाणारे भाविक खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्समार्फत जात असल्याने त्यांची अचूक संख्या सरकारी नोंदीत उपलब्ध नाही. राज्यातील विविध भागांतून ५०० हून अधिक टूर ऑपरेटर्सनी भाविकांना सौदीला पाठवले असून, एकट्या मुंबईतून १०० हून अधिक ऑपरेटर्सचा यात समावेश आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाने सर्व ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची मोहीम हाती घेतली असून, अडकलेल्या भाविकांची नेमकी संख्या लवकरच स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उमरा यात्रेसाठी जाणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाण मोठे असते. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानांची उड्डाणे सातत्याने रद्द होत राहिल्यास किंवा वास्तव्य लांबल्यास या भाविकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. भारतीय दूतावासाकडून आवश्यक ती मदत केली जात असली तरी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षित परताव्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी केली जाणार आहे.
दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव कतार, युनायटेड अरब अमिरात (Qatar, United Arab Emirates) आदी देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. याचा थेट फटका नागपूरसह विदर्भातील भाविकांना बसला आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून दोहा आणि शारजाकडे जाणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कतार एअरवेज ने नागपूर-दोहा सेवा स्थगित केली असून, एअर अरेबिया नेही शारजा-नागपूर उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहेत.
नागपूरसह संपूर्ण विदर्भातून हजारो श्रद्धाळूंनी महिनाभरापूर्वीच आठ ते पंधरा दिवसांच्या उमरा यात्रेचे नियोजन केले होते. तिकिटे व निवासाची बुकिंग पूर्ण झाल्यानंतर अचानक उड्डाणे रद्द झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. परिस्थिती स्थिर होईपर्यंत भाविकांची प्रतीक्षा वाढण्याची चिन्हे असून, केंद्र व राज्य सरकारच्या तातडीच्या समन्वयाची गरज आहे.
