वर्धा : इराण व अमेरिका यांच्यातील युद्धाचा जाळ लगतच्या मध्य पूर्वेतील अन्य देशात पेट घेत आहे. त्याचे विविध परिणाम आता अन्य देशांना बसू लागत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर या स्वरूपात त्याची दृष्य झळ भारतास लागत असल्याच्या घडामोडी आहेत. केंद्र व राज्य शासन त्यादृष्टीने कामाला लागले असून इंधन वितरण प्रणालीवर लक्ष ठेवल्या जात आहे. केवळ तेलच नव्हे तर अन्य दुष्परिणाम हळूहळू पुढे येत आहे.
अदृश्य फटका कां व कसा
क्रूड तेलाची आयात मंदावली. या तेलाचा विविध प्रकारे उपयोग होत असतो. नव्हे तर हेच तेल कारखाना व अन्य मोठ्या उद्योगास पूरक ठरते. या क्रूड तेलावर प्लास्टिक उद्योग अवलंबून आहे. क्रूड म्हणजेच कच्च्या तेलापासून एक विशिष्ट पदार्थ तयार होतो. प्लास्टिक खुर्च्या, बॉटल, पाईप व अन्य अश्या वस्तू तयार करण्यासाठी रेजिन हा पदार्थ क्रूड ऑइल पासून बनतो. हा पांढरा दाणा साबुदाण्यासारखा असतो. त्या पासूनच प्लास्टिक तयार केल्या जाते. हा दाणा इराण, चीन, मलेशिया येथून येतो. तसेच भारतात रिलायन्स उद्योग तो तयार करतो. विदेशातील दाणा स्वस्त म्हणून त्याची खरेदी भारतीय प्लास्टिक उद्योग करतो.
प्लास्टिक वस्तू महागल्या
रेजिन तुटवडा व भारतात मिळणारे महागले. परिणामी प्लास्टिक पाईप आता चढ्या दरात विकल्या जावू लागले आहे. पाईप साठी लागणारा दाणा हा ६० रुपयात मिळत होता. आता त्याची किंमत १२० रुपये किलो झाली. परिणामी ५ इंचीचा २० फूट लांब पिव्हीसी पाईप १८०० रुपयात मिळे. त्याची किंमत आता २६०० रुपये झाली आहे. बॉटलचा दाणा ११५ रुपये होता. त्याचा दर १८५ रुपये झाला आहे. पाईप महाग झाले आणि प्रामुख्याने शेती सिंचन साठी हे पाईप घेणे आवाक्यापलीकडे जाणार आहे. रब्बी हंगाम सूरू असतांनाच हे पाईप महागले. परिणामी ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी असे पाईप शेतात लावण्याचे ठरविले ते आता शक्य होणार नाही. यावर्षी शेतात सिंचन प्रणाली अश्यक्य, असं चित्र आहे.
उद्योजक काय म्हणतात
रेजिन दाणा महाग झाल्याने त्याचा अन्य अनेक गोष्टीवर विपरीत परिणाम होणे सूरू झाले आहे. पेयजल बॉटल निर्मिती ठप्प होण्याची दाट शक्यता व्यक्त होते. एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष व प्लास्टिक पाईप निर्माते प्रवीण हिवरे यांनी संभाव्य धोका व्यक्त केला. ते म्हणतात की भारतातील रेजिन दाणा परवडत नाही म्हणून विदेशातून तो आणल्या जातो. प्रामुख्याने चीन मधून. पण क्रूड तेल आवक मंदावली आणि दाणा निर्मिती ठप्प झाली आहे. क्रूड ऑइल ११९ डॉलर प्रती बॅरलवर पोहचले. परिणामी कच्च्या मालाचे दर ४० ते ९० टक्क्यांनी वाढले आहे. आम्हास वाढत्या दरात हा माल घ्यावा लागत आहे. त्याचा भुर्दंड शेतकरी व अन्य संबंधित लोकांना बसणार. हार्डवेअर विक्रेते पण त्रस्त झालेत. एक सूचना अशी की, या आपत्कालीन स्थितीत अशा बाबींची साठेबाजी व काळाबाजार होवू नये. सरकारने ती दक्षता घ्यावी, असे प्रवीण हिवरे सुचवितात.
