वर्धा : सुरक्षित व स्वस्त प्रवास म्हणून भारतीय प्रथम पसंती रेल्वे प्रवासास देतात, हे सत्य. काही शेकडो किलोमीटरचा असा प्रवास लांब पल्ल्याच्या रेल गाडीतून करतात तेव्हा त्यांना भोजन, नाश्ता आवश्यक ठरते. त्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. IRCTC म्हणजेच Indian Railway Catering and Tourism Corporation ही भारतीय रेल्वेची एक उपकंपनी आहे. ही तिकीट आरक्षण, खानपान, पर्यटन सेवा सांभाळते.

खाजगी ई कॅटरिंग

भारतीय रेल्वेने दररोज लाखो नागरिक देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करत असतात. रेल्वे प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आवडीचा भाग म्हणजे जेवण. आजकाल स्मार्टफोनच्या एका क्लिकवर ट्रेनच्या सीटवर बसून आपल्या आवडीचे गरमागरम जेवण मागवणे अत्यंत सोपे झाले आहे. पण, जर तुम्हीही प्रवासादरम्यान दिसणाऱ्या कोणत्याही आकर्षक जाहिरातींना भुलून खाजगी ई-कॅटरिंग (e-catering) वेबसाईट्सवरून जेवण ऑर्डर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी आणि सुरक्षेशी खेळणाऱ्या अनधिकृत संस्थांवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने आता मोठा बडगा उगारला आहे.

कारवाई करण्यात आली ?

IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवर अनेक अनधिकृत ई-कॅटरिंग व्यावसायिक बेकायदेशीरपणे सक्रिय झाले आहेत. हे व्यावसायिक कोणत्याही नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स किंवा ढाब्यांवरून अन्न खरेदी करतात आणि प्रवाशांना विकतात. या प्रक्रियेत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते.

अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्न शिजवणे, दर्जाहीन साहित्याचा वापर करणे आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – स्वयंपाकघरातील कामगार तसेच ट्रेनमध्ये जेवण आणून देणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’ची कोणतीही अनिवार्य वैद्यकीय तपासणी न करणे, असे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. अशा निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे प्रवाशांना गंभीर आजार किंवा विषबाधा होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

आर्थिक आणि सायबर धोका

या अनधिकृत संस्थांचा धोका केवळ आरोग्यापुरता मर्यादित नाही. या बेकायदेशीर वेबसाईट्स आणि ॲप्समुळे प्रवाशांची मोठी आर्थिक आणि सायबर फसवणूक होऊ शकते. ऑनलाईन ऑर्डरच्या बहाण्याने ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचा तपशील चोरीला जाण्याचा मोठा धोका यामागे दडलेला आहे. १४ वेबसाईट्सवर कारवाईचा बडगा उगारला.

या वाढत्या धोक्याची गंभीर दखल घेत, IRCTC ने अशा अनधिकृत आणि नियम मोडणाऱ्या तब्बल १४ वेबसाईट्सची यादी तयार केली आहे. या सर्व संस्थांवर आता कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यांना रेल्वे नेटवर्कवरून कायमचे उखडून टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक विशेष आणि धडक मोहीम हाती घेतली आहे.

प्रवाशांसाठी महत्वाचा सल्ला

प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये आणि त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी IRCTC ने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

प्रवाशांनी ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यासाठी केवळ खालील अधिकृत माध्यमांचाच वापर करावा:

  • IRCTC ची अधिकृत ई-कॅटरिंग वेबसाईट
  • रेल्वेचे अधिकृत ‘फूड ऑन ट्रॅक’ (Food on Track) मोबाईल ॲप्लिकेशन
  • IRCTC ने मान्यता दिलेले अधिकृत ई-कॅटरिंग फूड ॲग्रीगेटर्स (Authorised Aggregators)

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रवाशांनीही जागरूक नागरिक म्हणून अनोळखी किंवा अनधिकृत लिंकवरून जेवण मागवणे त्वरित टाळावे. पुढील वेळी ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करताना योग्य आणि अधिकृत माध्यमाची नक्की खात्री करा, जेणेकरून तुमचा प्रवास सुखकर आणि पूर्णपणे सुरक्षित होईल, असे आवाहन आहे.

अशासकीय सदस्य म्हणतात

आजकाल इंटरनेटवर अनेक बनावट व अनधिकृत वेबसाईट्स सक्रिय आहेत. अशा अनधिकृत वेबसाईट वरून खरेदी केल्यास प्रवाशांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा फसवणुकीनंतर अधिकृत यंत्रणेकडे तक्रार दाखल करणे देखील कठीण होते. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावध राहावे. रेल्वे प्रवाशांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांचा प्रवास आरोग्यदायी व सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेचे (Central Railway) झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी (ZRUCC) सदस्य श्री प्रणव जोशी यांनी प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.