अमरावती: धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भाविकांना देशातील प्रमुख तीर्थस्थळांचे दर्शन सुलभतेने घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वेची उपकंपनी ‘आयआरसीटीसी’ने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या २५ जून २०२६ रोजी ‘पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा’ या विशेष ‘भारत गौरव’ पर्यटक ट्रेनची सुरूवात करण्यात येणार आहे.

प्रवासाची सुरूवात कुठून होणार?

हा प्रवास एकूण ११ रात्री आणि १२ दिवसांचा असणार असून देशातील अत्यंत महत्वाच्या आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान भाविकांना जगन्नाथ पुरी, गुवाहाटी (कामाख्या देवी), जसिडीह (वैद्यनाथ ज्योतिर्लिंग), वाराणसी (काशी विश्वनाथ) आणि अयोध्या (प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर) या पवित्र स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ही रेल्वेगाडी २५ जून रोजी पुण्याहून सुटेल आणि ६ जुलै रोजी आपला प्रवास पूर्ण करून परत फिरणार आहे. पुणे स्थानकासह लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या प्रमुख स्थानकांवर बोर्डिंग (गाडीत चढणे) आणि डी-बोर्डिंग (गाडीतून उतरणे)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे.

प्रवासाचा खर्च किती?

केंद्र सरकारच्या रेल्वे पर्यटन धोरणानुसार या पॅकेजच्या दरांमध्ये सुमारे ३३ टक्के सवलत अंतर्भूत करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा असेल. स्लीपर डब्यांमधून २२ हजार ७७० रुपये, एसी ३ मधून ३९ हजार ६२० रुपये आणि एसी २ मधून प्रवास केल्यास ५२ हजार ८६० रुपये एवढे प्रतिव्यक्ती दर आहेत. निश्चित लोअर बर्थसाठी थोडे अधिक शुल्क मोजावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गरजू प्रवाशांसाठी रेल्वेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा केवळ ऑफलाईन बुकिंगद्वारे उपलब्ध आहे.

पॅकेजमध्ये काय सुविधा आहेत?

या प्रवासाच्या पॅकेजमध्ये प्रवाशांचा ट्रेन प्रवास, बसद्वारे स्थानिक प्रवास, हॉटेलची निवास व्यवस्था, चविष्ट शाकाहारी भोजन तसेच संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी गाईड आणि एस्कॉर्ट् सची सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रवासासाठी आयआरसीटीसीने प्रवाशांच्या सोयीनुसार तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये इकॉनॉमी (स्लीपर क्लास) ५०० जागा, स्टँडर्ड (थ्री टियर एसी) २०० जागा आणि कम्फर्ट (टू टियर एसी)-५० जागांचा समावेश आहे. प्रवाशांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.