नागपूर : भारतीय रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनने २३ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सहाय्यक व सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज १ मे २०२६ पर्यंत करता येणार आहेत. पदवीधर उमेदवारांना संधी असून, निवड प्रक्रिया सीबीटी परीक्षेद्वारे होणार आहे.
कोण अर्ज करू शकतो?
सहाय्यक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि मूलभूत संगणक ज्ञान आवश्यक आहे. सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदासाठी वाणिज्य, वित्त किंवा लेखाशास्त्रातील पदवीसह संबंधित कामाचा अनुभव अपेक्षित आहे. सीए किंवा एमबीए (फायनान्स) पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज कसा कराल?
- आयआरएफसीच्या अधिकृत वेबसाइटवर (https://irfc.co.in/hi) जाऊन अर्ज भरावा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- अंतिम तारीख येण्यापूर्वी अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया ऑनलाइन लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (आवश्यकतेनुसार), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांतून पार पडेल. या भरतीत सहाय्यक (NE-5) पदांच्या १६ जागा आणि सहाय्यक व्यवस्थापक (Finance, E-1) पदांच्या ७ जागांचा समावेश आहे. संगणकाधारित परीक्षा (CBT) जून २०२६ मध्ये होण्याची शक्यता असून, निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्ली-एनसीआरमधील मुख्यालयासह देशभरात केली जाणार आहे.
२३ रिक्त जागांची भरती
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लि. (IRFC) ही भारतीय रेल्वेच्या वित्तीय गरजा भागवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) पदांसाठी एकूण २३ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक ०१/२०२६ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ४ एप्रिलपासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना १ मे २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
वेतन व सुविधा
सहाय्यक पदासाठी मासिक वेतन २१,००० ते ७४,००० रुपये दरम्यान असून, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी ४०,००० ते १,४०,००० रुपये इतके वेतनमान आहे. वार्षिक पॅकेज १६ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय विविध भत्ते आणि सरकारी सुविधा देण्यात येणार आहेत.
नवरत्न’ दर्जाची कंपनी
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लि. ही ‘नवरत्न’ दर्जाची या कंपनी आहे. यात काम करण्याची संधी तरुणांसाठी आकर्षक मानली जात असून, स्थिर कारकीर्द आणि प्रगतीच्या दृष्टीने ही भरती महत्त्वाची ठरत आहे.
