वर्धा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. ईथुन निघणारे संदेश शिरसावद्य मानणारे लाखो अनुयायी आहेत. संघ प्रमुखांचा आदेश हा सर्वोच्च मानून त्याचे पालन करणारे विविध पातळीवार बघायला मिळतात. ही एक सामाजिक संघटना असा उल्लेख केल्या जात असतो. पण धर्मपीठ असा उल्लेख केल्यास संघविरोधी त्यावर आक्षेप घेत असतात. हिंदूंचा ठेका यांनीच घेतला काय, असे टीकेचे स्वरूप ऐकायला मिळते. मात्र ही तर हिंदूंची काशी असे जाहीर प्रशस्तीपत्र आता देण्यात आले आहे. कौडण्यपुर येथील जगतगुरु रामानंदाचार्य-राजेश्वरानंदचार्य यांचे असे प्रतिपादन आहे.

आर्वी येथे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, आपली भारतीय सभ्यता आणि सनातन संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ असुन ,सनातन संस्कृतीची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असलेल्या विदर्भातील नागपूर हे आपल्याला हिंदुत्वाचे मार्गदर्शन करणारे व्यासपीठ आहेत. आपल्या भगव्या ध्वजाची काशी नागपूर आहे.

आर्वी शहर हे अध्यात्माचे माहेरघर आहेत. आर्वी शहरात अनेक नामवंत संत होवून गेले असून त्यांनी आपल्याला मोलाचे धार्मिक, नैतिक, सामाजिक, अध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यामुळे आपली प्राचीन सनातन हिंदू संस्कृती, धर्म टिकवण्यासाठी प्रत्येक जागृत हिंदुनी ,आपल्या परपंरेबद्दल सकारात्मक दुष्टिकोन स्विकारायला पाहिजे, असे मोलाचे प्रतिपादन जगतगुरु-रामानंदाचार्य-राजेश्वरानंदचार्य कौंडण्यपूर यांनी केले.यावेळी व्यासपीठावर हिंदू धर्माच्या अभ्यासक डॉ. सिमाताई पंढरकर उपस्थित होत्या.

जगतगुरु राजेश्वरानंदचार्य पुढे म्हणाले की, जगातील परकीय शक्तीनी अनेक विध्वंसक ,विनाशकारी आक्रमक हल्ले करून हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले, परंतु सनातन हिंदू धर्माच्या भारतीयांनी हे हल्ले लिलया परतावून लावून हिंदू संस्कृती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भारतीय धर्म, संस्कृती, मूल्ये टिकवण्यासाठी व युवकांनी देशाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.त्यापुर्वी डॉक्टर सिमाताई पंढरकर यांनी हिंदू धर्माचे महत्त्व विषद करतांना सांगितले की,आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अनेक थोर महापुरुष, नामवंत संत जन्माला आले असून त्यांनी भारतीयांच्या मनात जाज्वल मूल्ये, देशभिमान,स्वधर्माबद्द्ल आदरभाव शिकविण्यासाठी मोठा पुढाकार घेतला.

त्यामुळे आपली पुरातन असलेली हिंदु संस्कृती काळाच्या प्रवाहात टिकून आहेत. त्यासाठी समाजाप्रती आपले नैतिक कर्तव्य आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासुन आपण हिंदुच्या एकत्रिकरणासाठी पुढाकार घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक समरसता जोपासल्यास,हिंदु संस्कृती व सनातन धर्माला बळकटी मिळेल, असेही नमूद केले.

महिलांनीही सुध्दा आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार करणे टाळले पाहिजे. त्यासाठी आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात स्नेहभाव, परोपकार, नैतिकता, साधनसुचिता जपली पाहिजे, असेही सांगितले. आपल्या देशात हिंदू हा समाज सहिष्णू असुन तो दुसऱ्या धर्माचा आदरभाव करतो. परंतु असे असतांना सुध्दा आपल्या देशात तथाकथित धर्मनिरपेक्षता जपणारी हिंदूद्रोही शक्ती हिंदूचे खच्चीकरण करण्याचा कुटील डाव खेळत आहेत. हा डाव भगव्याला नमन करणाऱ्या हिंदूनी उधळून लावावा.

त्यांचे मनसुबे उधळून लावून संपूर्ण हिंदू समाजाला संघटीत केले पाहिजे, असेही सांगितले. हिंदू संमेलनाचे संचालन संपदा जोशी तर प्रास्ताविक मिथिलेश बिजवे यांनी केले. आभारप्रदर्शन महेंद्र गोमासे यांनी केले. या हिंदू संमेलनात आर्वीचे आमदार सुमित वानखेडे, नगराध्यक्ष स्वातीताई प्रकाश गुल्हाणे, उपाध्यक्ष गौरव जाजू तसेच नगरपालिकेचे सदस्य आवर्जून उपस्थित होते. हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी अनिल जोशी, डॉ.विनय देशपांडे, श्रीकांत पेंडके, व्हि.टी.देशपांडे,रमेशराव नागोसे,सुरेन्द्र पारसे,सुनील पारसे,मिथिलेश बिजवे, विक्की गुल्हाणे, मुकुंद देशपांडे, रमेश ठाकरे, राजू मांजरे प्रकाश गुल्हाणे, पंकज दस्तुरे,महेंद्र गोमासे, रवींद्र गोडबोले इत्यादींनी सहकार्य केले. यावेळी विशाल हिंदू संमेलनात समाजातील अनेक नामवंत डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते ,आवर्जून उपस्थित होते.