यवतमाळ : आजच्या युगात हे चांगले, ते वाईट असे ठरविता येत नाही. ज्याला जे आवडते, तेच तो घेत असतो. त्यामुळे नायकप्रधान सामाजिक चित्रपट असो, की इतर खलनायकांच्या भूमिकांना विशेष महत्त्व देणारे चित्रपट असो, त्याचा फारसा परिणाम समाजमनावर होत नाही. चित्रपटांमधून प्रेक्षक त्यांना हवा तोच बोध घेत असतात. त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने व्यक्त केले.

यवतमाळ येथे जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी ती आली होती. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. शीतल वातीले यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत स्पृहा बोलत होती. दूरचित्रवाणीला प्रेषक खूप आहेत. हे माध्यम घराघरांत पोहोचलेले आहे. त्यामुळे मालिकांनाही चांगले दिवस आहेत. विदर्भात नाटकांचे प्रयोग होतात. नवीन वर्षात नागपूर, अमरावती आणि अकोला या शहरांमध्ये माझ्या ’पुरुष’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. यवतमाळकरांनी त्या ठिकाणी येवून ’पुरुष’ आवर्जून बघावे, असे आवहानही स्पृहा जोशी यांनी याप्रसंगी केले. नाट्यप्रयोगांबद्दल बोलताना ती म्हणाली की, जेव्हा एखाद्या शहरात नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होतात, तेव्हा त्यांना प्रेषक आपोआपच लाभत असतो. प्रयोगांसोबत प्रेषकही घडत असतात.

येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट दिल्यावर मलाही माझ्या महाविद्यालयीन जीवनाची आठवण झाल्याचे तिने सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मला आनंद झाला. तरुण वय हे क्रांती करायला उत्सुक असते. त्यांना त्यांच्या वयातील लोकांनी सांगितलेले अधिक आवडते. मीही त्यांना त्यांच्या जवळची वाटते. तरुण-तरुणी हे आपल्या आई-वडिलांपेक्षा आपल्या वयाच्या ताई-दादांचे म्हणणे अधिक ऐकत असतात. मी कुणी तत्वज्ञ नाही, मोटीव्हेशनल स्पीकर नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना माझ्या चार कविता ऐकविल्या. त्यांना आवर्जून एक गोष्ट सांगितली की, ’केवळ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना मनाची कवाडं बंद करू नका, इतरही क्षेत्रात आपला ठसा उमटवा.’ तरुणांनी नवीन काही शिकलं पाहिजे, असा सल्ला दिल्याचे स्पृहाने सांगितले.

अभिनेत्री स्पृहा जोशी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय संवेदनशील आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने मालिका, चित्रपट आणि नाटके या तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ती उत्तम अशी कवयित्री आहे.

अभिनय व्यवसाय, पण…

अभिनय हा माझा व्यवसाय असला तरी मी केवळ अभिनयातच रमते असे नाही, मला कविता करणे आवडते, पुस्तके वाचायला आवडतात. मला जे जे आवडते ते ते मी करीत असते असे मत यावेळी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने व्यक्त केले.