भाजपचे चाचा- भतीजा (नरेंद्र मोदी, अमित शहा) हे काँग्रेसच्या परिवारवादाचा मुद्दा वारंवार काढतात. प्रत्यक्षात काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी देशासाठी जीव दिला. परंतु भाजप नेते स्वत:च्या मुलाला दिलेले पद विसरतात. गृहमंत्र्यांचा मुलगा जय शह याला बीसीसीआयचे पद कसे मिळाले? ते त्यांचेच पुत्र आहेत ना की त्यांना अमित शहा यांनी रेल्वे फलाटावरून उचलून आणले? असा प्रश्न काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी उपस्थित करत भाजपवर सडकून टीका केली.

बहुजन विचार मंच यांच्या वतीने राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित टेक्नो यात्रेच्या रॅलीनंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपने एक अग्निवीर गडकरींना त्यांनी बाजूला सारले. त्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसाद आणि पुढे इतरही अनेक अग्निवीर बाहेर काढले जातील. शेवटी चाचा, भतीजा हे दोघच तेथे शिल्लक राहतील. यापैकी चाचा विमानात जग फिरतील तर भतीजा परिवार वादावर भाषने ठोकतील. काँग्रेसच्या गांधी कुटुंबातील दोन पंतप्रधानांनी देशासाठी जीव दिला. भाजप नेत्यांनी त्यांच्या मुलांना दिलेली पदे दिसत नाहीत. अमित शहा यांचा मुलगा युपीएससी उत्तीर्ण करून बीसीसीआयचा सचिव झाला काय?, तो अमित शहा यांचा मुलगा नाही का?, त्याला रेल्वे फलाटावरून उचलून आणले का, हे शहा यांनी स्पष्ट करायला हवे. भाजपमधील अनुराग ठाकूर, पियूष गोयल कुणाची मुले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुणाचे मुलगे आहेत. राजनाथ सिंग यांचा मुलगा आमदार आहे की नाही? भाजप परिवारवादावर केवळ नाटक करून लोकांना संभ्रमित करत आहे. भाजपकडून विविध राज्यांत डबल इंजिन की सरकार असा प्रचार केला जातो. प्रत्यक्षात याचा अर्थ एक विकत आहे, दुसरा चाचा- भतीजाशी जवळीक असलेला उद्योजक मित्र ते विकत घेत आहे, असा होत असल्याचाही आरोप कन्हैय्या कुमार यांनी केला. याप्रसंगी नितीन राऊत, सुनील केदार, शिवाजीराव मोघे, अभिजित वंजारी, राजेंद्र मुळक, अनिस अहमद, अशोक धवड, नरेंद्र जिचकार, प्रफुल्ल गुडधे आणि इतरही नेते उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेसचे नेते विकास ठाकरे व त्यांच्या गटातील बरेच नेते उपस्थित नसल्याने येथे गटबाजीची चर्चा रंगली होती.

देशाला विकले जात असतानाही ‘भक्त’ गप्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेल्वे स्थानकावर कुणीही चहा विकतांना बघितले नाही, परंतु त्यांनी सांगितले म्हणून त्यांचे आंधळे चाहते अर्थात ‘भक्त’ ते मान्य करतात. परंतु आता सर्रास देशातील महत्वाच्या कंपन्यांच्या माध्यमातून देश विकला जात असतांनाही हे भक्त गप्प आहेत, अशी टीकाही कन्हैय्या कुमार यांनी केली.

राजीवजी खरे बोलायचे, आता जुमलेबाजीच
राजीव गांधी खरे बोलत होते. पंतप्रधान असतांना त्यांनी नागपुरातच केंद्र सरकारने सामान्यांच्या योजनेसाठी १ रुपया दिल्यास प्रत्यक्षात जनतेपर्यंत काही पैसेच पोहचत असल्याची कबुली दिली होती. ते खरे बोलतांना त्यांच्या पक्षातील नेत्यांचाही विचार करत नव्हते. परंतु आता केवळ जुमलेबाजी सुरू आहे. त्यानुसार युवकांना वर्षांला २ कोटी रोजगाराचे वचन, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाखांचे आश्वासन, प्रत्येकाला घराची आश्वासने दिली आहेत. यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसल्याची टीका कन्हैय्या कुमार यांनी केली. सध्याची स्थिती बघितली तर एकही पत्रकार व नागरिक पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकत नाही. ते केवळ एकतर्फी मन की बात करतात. कुणी प्रश्न विचारला तर प्रथम त्यांना पैशाच्या जोरावर आपले करण्याचे प्रयत्न होते. पुढचा डगला नाही राहिला तर मग घाबरवणे व त्यानंतरही ऐकले नाही तर त्याला कायमचे बेपत्ता केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
..तेव्हा संघवाले पळाले

काही लोकांनी व्हॉट्स ॲप वा इतर माध्यमातून भ्रम निर्माण केल्याने आज कुणी स्वातंत्र आपोआप मिळाले, कुणी लिजवर मिळाले, असे मनात येईल तसे वक्तव्य करतात. परंतु आम्ही व काँग्रेसने स्वातंत्र लढय़ात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यासाठी अनेकांनी प्राणाची आहूती देत हसत- हसत मृत्यू पत्करला. अनेक आईने मुलांना गमावले, अनेकांनी आपले कुंकु पुसले. परंतु ज्या संघ व भाजपच्या लोकांनी लढय़ातून पळ काढला ते आता नागरिकांना स्वातंत्र्याबाबत सांगत आहेत. हे लोक केवळ भगवा हा एकच रंग नागरिकांवर थोपू पाहत होते. परंतु काँग्रेसने तिरंग्याचे महत्व नागरिकांना पटवल्याने त्यांना घरोघरी तिरंगा लावण्याचा प्रचार करून तिन्ही रंग स्वीकारावे लागल्याचेही कन्हैय्या कुमार म्हणाले.