जयपूर मेट्रोचा तोटा वर्षांला ३० कोटी; प्रकल्पावरील अवाढव्य गुंतवणुकीवरही प्रश्नचिन्ह

हजारो कोटी रुपये खर्च करून देशाच्या विविध मोठय़ा शहरात सुरू करण्यात आलेले मेट्रो रेल्वे प्रकल्प पुरेशा प्रमाणात प्रवाशी मिळत नसल्याने तसेच उत्पन्नाचे इतरही स्रोत विशेष परिणामकारक ठरत नसल्याने कोटय़वधी रुपयांनी तोटय़ात आहेत. जयपूर मेट्रो हे अलीकडच्या काळातील यासंदर्भातील उदाहरण असून आगामी काळात नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या मेट्रोला याच समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

देशातील ‘ब’ वर्गातील महानगरात सुरू होणारी जयपूर मेट्रो ही पहिली आहे. या मेट्रोचे संचालन, व्यवस्थापन आणि त्यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी नागपुरातील महामेट्रोतर्फे एक पाहणी दौरा आयोजित केला होता. या दरम्यान निदर्शनास आलेल्या बाबींवरून मेट्रोवर होणारा अवाढव्य खर्च आणि त्याची उपयोगिता याचे प्रमाण व्यस्त असल्याचे स्पष्ट होते. जयपूर मेट्रोचा प्रवास ३ जून २०१५ पासून सुरू झाला. ९.६३ किलोमीटर अंतरासाठी २०४४ कोटी रुपयांचा खर्च आला. मेट्रो चालविण्यासाठी जयपूर मेट्रो रेल्वे महामंडळाला दररोज १० लाखाचा खर्च आहे, त्या तुलनेत २.५ लाखाचे उत्पन्न मिळते. वर्षांला ३० कोटींचा तोटा आहे. दररोज २२ हजार प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतात. तोटा भरून काढण्यासाठी जयपूर सरकारने विविध बाबींवर अधिभार लावले आहेत. जयपूर ही पर्यटन आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेले शहर आहे. लाखो पर्यटक येते येत असूनही ते मेट्रोकडे वळत नाही ही अशा प्रकल्पासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

नागपूर मेट्रोचा विचार केला तर येथेही पहिल्या टप्प्यात हीच समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यात खापरी ते विमानतळ (जमिनीवरून धावणारी ) या दरम्यान मेट्रोची चाचणी ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. या टप्प्यातही प्रवाशी मिळण्याची शक्यता नाही.

नागपूर पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध नाही, स्थानिक लोकांवरच मेट्रोचा आधार आहे. बहुतेकांकडे असलेली स्वत:ची वाहतूक साधने लक्षात घेतली तर बुटीबोरी ते बर्डी असा तिचा विस्तार झाला तरच लोक मेट्रोने प्रवास करतील. तोपर्यंत मेट्रोला तोटा सहनच करावा लागेल.  नागपूर मेट्रोचे अधिकारी ही बाब मान्य करतात, मात्र दुसऱ्या टप्प्यात शहराच्या बाह्य़ भागाशी मेट्रो जोडली जाणार असल्याने कालांतराने ही समस्या नागपुरात राहणार नाही, असेही ते स्पष्ट करतात

कुठल्याही मेट्रोला पहिल्या टप्प्यात पुरेशे प्रवाशी मिळत नाही, संपूर्ण विस्तार झाल्यावरच पुरेशा प्रमाणात प्रवासी त्यातून प्रवास करतात. दिल्ली, बंगळुरू, कोच्ची आणि इतरही ठिकाणी असाच अनुभव आहे, असे जयपूर मेट्रोचे प्रकल्प संचालक अश्विनीकुमार सक्सेना यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इतर मेट्रोच्या तुलनेत जयपूर मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे, असे त्यांनी सांगितले.

खर्च न पेलणारा

प्रकल्प उभारणी करताना तो दर्जेदार व्हावा म्हणून सोयी-सुविधांवर मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो. स्थानकाच्या उभारणीपासून तर तेथील इतर सुविधांचा त्यात समावेश होतो. मात्र, त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी मिळत नसल्याने किंवा तेवढे उत्पन्न होत नसल्याने या सुविधांची उपयोगिता उरत नाही. जयपूर मेट्रोला सध्या हीच समस्या उद्भवत आहे. स्थानकावर त्यांच्याकडे असलेली जागा भाडेपट्टीवर देऊन उत्पन्नाचा नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसादच नाही. नागपूरमध्ये जयपूरपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. मेट्रो मार्गावर जादा एफएसआय देण्यापासून तर स्थानकांवरील जागा विक्रीतून मिळणारे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. मात्र जयपूरचा अनुभव लक्षात घेतला तर नागपूरचा मार्गही काटेरी ठरण्याचा धोका नाकारता येत नाही.

‘डबल डेकर’ची संकल्पना जयपूरची

नागपूरमध्ये बांधण्यात येणाऱ्या दोन डबल डेकर पुलाची मूळ कल्पना जयपूर मेट्रोची आहे. अशाप्रकारचा पूल तेथे प्रथम बांधण्यात आला. त्याच आधारावर नागपूर मेट्रो वर्धा मार्गावर आणि उत्तर नागपुरात बांधणार आहे. वर्धा मार्गावरील काम सुरू झाले आहे.

विस्तारित टप्प्यात मेट्रो फायद्यात

सध्या एकाच टप्प्यात मेट्रो धावते, मात्र २३ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यात जयपूरमधील सर्व शासकीय कार्यालयांसह इतर भागांना मेट्रोने जोडले जाईल, त्यावेळी प्रवाशांची संख्या वाढेल. सुरुवातीच्या काळात दिल्लीसह सर्वच मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद नव्हता, तो कालांतराने वाढला. जयपूर मेट्रोची संख्याही ८ हजारावरून आता २२ हजारापर्यंत पोहोचली आहे.

अश्विनीकुमार सक्सेना, संचालक (प्रकल्प) जयपूर मेट्रो.