नागपूर : जलजीवन मिशनअंतर्गत केलेल्या कामांची ५० हजार कोटींचे देयके थकीत असल्याने कंत्राटदारांच्या महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा संघटनेने गेल्या महिनाभरापासून कामे थांबवली आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून कोणतीही पावले उचलण्यात न आल्याने राज्यातील २४ हजार योजनांचे भवितव्य अधांतरी आहे. याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने जलजीवन मिशनअंतर्गत राज्यात ५० हजार योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. ही योजना सुरू झाल्यानंतर सलग दोन वर्षे कंत्राटदारांना कामाचा निधी व्यवस्थित मिळत होता. मात्र, २०२४ पासून केंद्र सरकारने निधी बंद केला. दरम्यान, या काळात कंत्राटदारांनी २६ हजारांपर्यंत योजनेची कामे पूर्ण केली. परंतु राज्यातील २४ हजारांवर योजनेची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यातील काही १० हजार योजनेची कामे ८० टक्के तर १४ हजार योजनेची कामे ५० ते ६० टक्केच पूर्ण झाली असल्याचे महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नमुद केले. गेल्या दोन वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने थकीत ३५ हजार कोटींची रक्कम आता ५० हजार कोटींवर गेली. याबाबत प्रशासन तसेच मंत्र्यांपर्यंत निवेदने देण्यात आली. परंतु कुणीही दखल घेतली नसल्याने  १५ एप्रिलपासून कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केले. परिणामी अपुर्‍या राहिलेल्या २४ हजारांवर योजनांचे भवितव्य अधांतरी आहे.

जलजीवन मिशनच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन दिल्लीला जाऊन आले. काही कागदपत्राची पुर्तता करण्याच्या सूचना आहेत. त्यानंतर केंद्राकडून १००० हजार कोटी मेअखेर मिळण्याची शक्यता आहे.- गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री निधी उपलब्ध करून देण्याबाबत २८ एप्रिल रोजी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक झाली. परंतु तोडगा निघाला नाही. कंत्राटदारांकडेही आता पैसे नसल्याने कामे बंद करण्यात आली. – बाळासाहेब जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना.

नुकताच झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेण्याचे आश्वासन दिले. परंतु मागण्यासंदर्भात ग्वाही दिली नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १७ मे रोजी मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. – रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष, शासकीय कंत्राटदार संघटना, जिल्हा परिषद, नागपूर.

देखभालही बंद

जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरांमध्ये नळातून पाणीपुरवठा केला जातो. गावामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना राबवणे, जुन्या योजनांचे बळकटीकरण, देखभाल, नळ जोडणीसाठी पाइपलाइन टाकणे, जलकुंभ बांधण्याची कामे केली जाते. राज्यात आतापर्यंत २६ हजारांपर्यंत योजनांची कामे झाली. या योजनांच्या देखभालीची जबाबदारीही कंत्राटदारांवर आहे. परंतु आता कंत्राटदारांनी देखभालही बंद केली आहे.