बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या ‘धडावेगळे शीर’ प्रकरणाचे अर्थात विचित्र व रहस्यमय हत्याकांडाचे पडसाद आज, मंगळवारी थेट विधानसभेत उमटले! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करीत थेट गृहमंत्री खात्याचाही कारभार पाहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा पोलीस दलासह राज्याच्या गृह खात्याची नामुश्कि करणाऱ्या या घटनेच्या तपासाची सद्यस्थिती आणि निष्पाप पिता-पुत्रांना न्याय मिळणार का, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला.

काय म्हणाले फडणवीस?

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर कारवाई थांबणार नसून दोषींवर निष्कासनासह फौजदारी कारवाईही केली जाईल, असे सभागृहात त्यांनी ठणकावून सांगितले.

रोहित पवारांचा सवाल; फडणवीसांचे स्पष्ट उत्तर

आज विधानसभेत आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला आहे, तसेच चुकीच्या तपासामुळे अटक झालेल्या निष्पाप पिता-पुत्रांना शासनाकडून मदत दिली जाणार का, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा प्रकार महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्यावरच विषय संपणार नाही. ज्यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच, जे निष्कासनास पात्र असतील त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात येईल.

तपासात एआय तंत्रज्ञानाची मदत

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी आतापर्यंत राज्यातील सुमारे १७०० बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली आहे.त्यापैकी ७ महिलांचे चेहरे मृतदेहाशी जुळल्याचे प्राथमिक स्तरावर आढळून आले असून, त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

राजुरा शिवारात एप्रिल महिन्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडापासून वेगळा केलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जळगाव जामोद पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका पिता-पुत्राला अटक करून त्यांनीच स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा दावा केला होता. या तपासात मोठे यश मिळाल्याचा दावा करीत पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली.
मात्र काही दिवसांतच या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली. ज्या मुलीच्या खुनाचा आरोप ठेवून पिता-पुत्राला अटक करण्यात आली होती, तीच तरुणी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि अटक करण्यात आलेल्या दोघांची तत्काळ सुटका करण्यात आली.

…आणि निलंबन

या गंभीर निष्काळजीपणानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार तसेच एलसीबीच्या तपास पथकातील चार कर्मचाऱ्यांसह एकूण सहा पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. मात्र, राजुरा शिवारात सापडलेल्या अज्ञात तरुणीच्या मृतदेहाचे गूढ अद्याप कायम असून मूळ आरोपींचा शोध लागलेला नाही.