बुलढाणाः बाळाचा जन्म कोणत्याही मातेसाठी आनंदाचा, कृतार्थतेचा क्षण असतो. कोणतीही विवाहिता मुलबाळ झाल्याशिवाय अपूर्ण अशी पारंपरिक समजूत. ती महिलाच काय संपूर्ण घर, परिवार आणि नातेवाईक हे देखील घरात बाळ जन्मला की आनंदाने हरखून जातात आपआपल्या कुवतीनुसार जल्लोष साजरा करतात.
आदिवासी बहुल क्षेत्रातील अजब गजब घटना
आता या बाळ जन्म पुराणाचे कारण देखील तितकेच मजेदार आहे. एखाद्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला तर ती अजूनही कुतूहल, कौतुकाची बाब ठरते. आजच्या संगणक आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळातही हीच स्थिती आहे. महिलेने तीळ्यांना जन्म देणे तर आश्चर्य, धक्कादायक आणि चिकित्साचा विषय ठरतो. यामुळे एका महिलेने एकाच वेळी तब्बल चार बाळांना जन्मास घालणे ही तर वैद्यक क्षेत्रालाही दखल घेण्यास भाग पाडणारी घटना ठरणार हे उघड आहे. त्यातही चार मुलांचा जन्म घरातच झाल्याने वैद्यकीय क्षेत्र हादरने स्वाभाविक ठरते.
चारबन ठरले लक्षवेधी
जळगाव जामोद तालुक्यातील चारबन या आदिवासीबहुल चिमुकल्या गावात ही आश्चर्यकारक घटना घडली आहे. रियाणी पंशाराम सस्त्या (वय २७) या महिलेने घरातच झालेल्या मुदतपूर्व प्रसूतीमध्ये एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये ३ मुले आणि १ मुलगी यांचा समावेश आहे. कोणत्याही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना प्रतिकूल परिस्थितीत ही प्रसूती सुखरूपपणे पार पडल्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
सात लेकरांची आई!
प्रसूतीनंतर मातेसह नवजात चारही बाळांना प्रारंभी जळगाव जामोद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत मातेसह बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रसूती मुदतपूर्व झाल्याने व नवजात बाळांचे वजन प्रत्येकी केवळ ९०० ग्रॅमच असल्याने अतिदक्षतेच्या आवश्यक उपचारासाठी माता व चारही बाळांना नंतर खामगाव येथील जिल्हा उप सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियाणी सस्त्या या महिलेला याआधी २ मुली व १ मुलगा असून आता कुटुंबातील अपत्यांची संख्या एकूण ७ झाली आहे. त्यामुळे ती दोन तीन नव्हे तब्बल ७ पुत्रांची आई ठरली आहे. एकाच प्रसूतीमध्ये चार बाळांचा जन्म होण्याची घटना ही दुर्मिळ असल्याने लोकांमध्येही कुतूहल व्यक्त होत आहे. वैधकीय क्षेत्रातही कुतूहल निर्माण झाले आहे.
