अमरावती: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांचा वारसा पुढे नेणारे, अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे गुरूदेवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जनार्दनपंत बोथे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वीय सहायक म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता आणि सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचा ‘ग्रामोद्धार’ हा संदेश घराघरांत पोहचवला. जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री जाहीर झाल्याचे कळल्यानंतर गुरूकूंज मोझरी येथे बोथे यांच्या सेवाकार्याची पावती मिळाल्याची प्रतिक्रिया उमटली. बोथे गुरूजी यांनी आपले आयुष्य गुरूकूंज मोझरी येथील आश्रमासाठी वाहून घेतले आहे.
जनार्दनपंत बोथे यांनी आपल्या आयुष्याची आठ दशके या सेवाव्रतात समिधेसारखी अर्पण केली. राष्ट्रसंतांचे स्वीय सहाय्यक, त्यांचे अधिकृत छायाचित्रकार आणि गुरूकूंज मोझरी येथील आश्रमाचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख आहे.
ज्या काळात तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होते, अशा वेळी राष्ट्रसंतांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्याचे दस्तऐवजीकरण करण्याची दूरदृष्टी खुद्द महाराजांनीच बोथे यांना दिली. महाराजांच्या सूचनेवरून त्यांनी टिपलेली छायाचित्रे आज गुरुकुंज मोझरी येथील अमूल्य ऐतिहासिक ठेवा ठरली आहेत. या छायाचित्रांसाठी आता राज्य शासनाच्या निधीतून स्वतंत्र कला दालन साकारत असून, त्या माध्यमातून राष्ट्रसंतांचा जीवनप्रवास येणाऱ्या पिढ्यांना अनुभवता येणार आहे. केवळ छायाचित्रकार म्हणूनच नव्हे, तर महाराजांचे स्वीय सहायक म्हणून सावलीसारखे सोबत राहताना त्यांनी सेवाधर्माची खरी व्याख्या अधोरेखित केली.
राष्ट्रसंतांनी ज्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. त्याचा व्याप पूर्ण भारतभर आहे. बोथे यांना वेळोवेळी दौरे करावे लागतात. शाखांना भेटी द्यावी लागते. कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. अजूनही ते तत्परतेने ही सगळी कामे न चुकता करतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीला समाजाभिमुख करण्यामध्ये बोथे यांचा सिंहाचा वाटा आहे. दरवर्षी भव्य दिव्य होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवातून त्यांच्या नियोजनाची साक्ष पटते. पद्मश्री पुरस्कारामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आयुष्यभर समाजोन्नतीसाठी झिजले. साहित्यातून ग्रामीण जीवनाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला. समाजपरिवर्तनाच्या विचारातून ‘ग्रामगीता’ लिहिली. ग्रामोन्नती साधायची असेल तर खेड्यात जाऊन प्रबोधन करावे लागेल हे जाणून राष्ट्रसंतांनी गावागावांत जावून प्रचार केला. ग्रामस्वच्छतेचा मंत्र दिला. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामगीता हाच उपाय आहे, असे जनार्दनपंत बोथे यांचे म्हणणे आहे.
