भंडारा : मनाला चटका लावून जाणारी एक घटना भंडारा जिल्ह्यात आज घडली. एकीकडे वडिलांचा अपघाती मृत्यू. घरात शोककळा आणि दुसरीकडे बारावीची परीक्षा ! वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून अत्यंत दुर्दैवी व कठिण परिस्थितीतही लेकीने धैर्याने परीक्षा दिली.

जान्हवी हौशीलाल राहांगडाले असे या लेकीचे नाव असून तीची कहाणी खरोखरच मन हेलावून टाकणारी आणि तितकीच प्रेरणादायी आहे. दुःखाच्या गर्तेतही शिक्षणाची मशाल हातात घट्ट पकडणाऱ्या जान्हवीच्या जिद्दीने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे.

तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी हौशीलाल राहांगडाले (५१) हे सोमवार दुपारच्या सुमारास सायकलने घरी परत येत असताना त्यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, मंगळवारी (१० फेब्रुवारी) बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला दिवस होता. हौशीलाल राहांगडाले यांची कन्या जान्हवी हिचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. ती जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील विद्यार्थिनी असून याच परीक्षा केंद्रात सकाळी दहाच्या सुमारास मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रात दाखल झाली.

कुटुंबीयांनी शाळेचे मुख्याध्यापक पंकज बोरकर व केंद्र संचालक प्रा. नीलकंठ कापगते यांना जान्हवीच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. दोघांनीही तिला धीर देत मानसिक आधार दिला. डोळ्यांत अश्रू, मनात वडिलांचे स्मरण करत जान्हवीने खंबीरपणे इंग्रजीचा पेपर सोडविला. परीक्षा पूर्ण होताच तीने अश्रृंना वाट मोकळी करून दिली. ‘बारावीची परीक्षा ही जीवनातील टर्निंग पॉईंट’. वडिलांचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत होता, पण त्यांच्या स्वप्नांसाठी मी ही परीक्षा दिली अशी भावनिक प्रतिक्रियाही जान्हवीने व्यक्त केली.

जान्हवी ही हुशार विद्यार्थिनी

जान्हवी ही अभ्यासात अत्यंत हुशार असल्याचे तिला शिकविणारे प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचीरे यांनी सांगितले. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. परिस्थिती मात करून तिने शिक्षण घेण्याचे ठरविले. आंबागड ते तुमसर हे अंतर आठ किलोमीटर आहे. दररोज मात्र ती नियमित येत होती.

वडिलांची लाडकी

मुली ह्या वडिलांच्या अतिशय लाडाच्या असतात. ती बाब जान्हवी बाबतही आहे. जानवी ही आपल्या वडिलांच्या अगदी जवळ होती. वडिलांचे छत्र हरपल्याने तिच्यावर निश्चितच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण तीने स्वतःला सावरत पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर दिल्यानंतर जान्हवी दुपारी गावात परतल्यानंतर तिच्या वडिलांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावे संपूर्ण आंबागड गाव हळहळला.