नागपूर : जंतरमंतर येथे राष्ट्रध्वज फडकवल्याबद्दल पाच दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवले जात असेल, तर देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे का, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत, देशात आणीबाणी लादायची असेल तर ती अधिकृतपणे लादण्याचे धाडस दाखवा, अशी टीका त्यांनी केली. सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेमके काय म्हणाले दिपके
‘जंतरमंतरवर राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे पाच दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणे, ही कोणती लोकशाही आहे? आणीबाणीच्या काळातही असे घडले नव्हते. तिरंगा फडकवणे हा देशातील सर्वांत मोठा गुन्हा ठरला आहे का? देशात आणीबाणी लादायची असेल, तर ती अधिकृतपणे लादा,’ असे दिपके म्हणाले.
संविधान आणि आंबेडकरांच्या विचारांचा पुरस्कार
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे दिपके यांनी सांगितले. देशाचे संचालन संविधानानुसार होते आणि डॉ. आंबेडकरांचे विचार हे त्याचा आधार आहेत, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशावर लादण्याचा प्रयत्न झाला, तरी देश डॉ. आंबेडकरांच्या विचारांनुसारच चालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा
इंडिया आघाडी आणि सीजेपीच्या आंदोलनांविषयी बोलताना दिपके यांनी सीजेपी ही स्वतंत्र दबावगट म्हणून काम करणारी संघटना असल्याचे स्पष्ट केले. मात्र, स्वतंत्र भूमिका असली तरी इंडिया आघाडीच्या विरोधात असल्याचा त्याचा अर्थ होत नाही. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या आंदोलनांचा उद्देश समान असल्याचे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयावरही आरोप
संस्थेविरोधात आंदोलन करणे योग्य आहे का, या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे, पक्षांची निवडणूक चिन्हे गोठवणे आणि मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने दिलेल्या भूमिकेचा संदर्भ देत, यंदा मतदान करता आले नाही तर पुढच्या वेळी मतदान करा, असे मतदारांना सांगितले जात असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पुढच्या निवडणुकीत लढण्यास सांगणार का, असा सवाल त्यांनी केला.
परदेशी निधीच्या आरोपांची चौकशी करा
अलीकडील ‘जनरेशन झेड’ आंदोलनांना परदेशातून निधी मिळत असल्याचा ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी केलेल्या आरोपांबाबत दिपके यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. परदेशी निधीचे पुरावे असतील, तर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे द्यावेत आणि त्यानुसार चौकशी करून कारवाई करावी, असे ते म्हणाले. आरोप करण्याऐवजी तपास करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केल्याबाबतही दिपके यांनी टीका केली. प्रत्येक मुद्द्यात पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेचा संदर्भ देण्याऐवजी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. दरम्यान, दिपके यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
