वर्धा : दिल्लीत जंतरमंतर येथे विविध मुद्द्यावर गत एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांना रुग्णालयात पोलिसांनी हलविले आणि आंदोलन अधिक तीव्र झाले. देशभरातून लाखो युवक दिल्लीत डेरा टाकून बसले आहेत. विविध अडचणींवर मात करीत तिथे पोहचणारे लगेच आंदोलनात उतरले.

वर्धेकर आता आघाडीवर

या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातून पण काही पोहचले. त्यात प्रामुख्याने युवा संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते आहेत. त्याचे नेतृत्व या संघटनेचे प्रेरक व देवळीचे अपक्ष म्हणून निवडून आलेले नगराध्यक्ष किरण ठाकरे हे करीत आहे. सोमवारी ते आपले सहकारी सोबत घेत दिल्लीत उतरले. मात्र आंदोलनस्थळी पोहचण्याची त्यांची वाट बिकट अशीच होती. अश्रूधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज, काही ठिकाणी चेंगराचेंगरी असा सामना करीत ते आंदोलन स्थळाच्या काही अंतरावर पोहचू शकले. कारण त्या स्थळावर लाखोचा जमाव व सभोवताल पोलिसांचा घेराव. पण आहे त्याच ठिकाणी नगराध्यक्ष ठाकरे यांनी ठिय्या देत नारेबाजी सुरू केली. ते पाहून इतर भागातून आलेल्या युवकांनी पण त्यांना साथ देणे सुरू केले.

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी

अवघ्या तिशीतील ठाकरे यांनी या आंदोलनात उडी घेत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. दिल्लीतून लोकसत्ताशी बोलतांना ठाकरे म्हणाले की आज आम्ही घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करणार. काल सोमवारी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बळजोरीने हटविले. पण रात्रीपासून विद्यार्थी, युवक परत तिथे जमा होवू लागले. आज दिपके व अन्य सहकारी तिथे जम ठेवून आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा महत्वाचा आहे. आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार ठाकरे व्यक्त करतात.

दिल्लीत जनजीवन सुरळीत

या आंदोलनाचे वैशिष्ट्य सांगताना ठाकरे म्हणतात की, येथे देशभरातून लाखो युवक जमा झाले. पण स्थानिक नागरिकांना त्यांचा काहीच त्रास नाही. युवक जमा असलेल्या भागातील सर्व दुकाने उघडी आहेत. व्यवहार सुरळीत होत आहे. किरकोळ वादग्रस्त घटना घडली असेलही. पण आंदोलक शांततामय मार्गानेच भावना नोंदवित आहे. त्यांचे कौतुकच. पेपरफूट थांबवा, हीच मुख्य घोषणा आहे. आम्हास स्थानिक नागरिक पण समर्थनच करतात, असे ठाकरे नमूद करतात. दिल्ली केव्हा सोडणार, या प्रश्नावर ते म्हणाले की आज तरी निश्चित असे काही ठरले नाही. पण आज आंदोलन व्यासपीठ गाठू. चर्चेत विषय समजून घेऊ. नंतरच परतीचा प्रवास.