नागपूर : नागपूरजवळील कळमेश्वरच्या लिंगा येथे ७० हजार कोटी रुपयांच्या एकात्मिक कोळसा वायूकरण आणि रासायनिक प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय आत्मनिर्भरतेचा नवा मंच, असेल. या प्रकल्पातून ३० हजार थेट रोजगार निर्माण होणार असून, प्रगत रासायनिक उत्पादन आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर नागपूरचे स्थान ठळक होईल, अशी माहिती अदानी एअरपोट्सचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले.
नागपुरातील अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात जीत अदानी बोलत होते. विदर्भ हा केवळ महाराष्ट्राचा एक भाग नसून, येत्या दशकांमध्ये भारताच्या विकासकथेला दिशा देणारा प्रदेश ठरेल. ‘विदर्भ’ हा शब्द या भूमीची शुद्धता, सामर्थ्य आणि वैशिष्ट्य दर्शवतो.
रुक्मिणीची भूमी, प्राचीन विदर्भ राज्यांची परंपरा, तसेच तुकडोजी महाराजांच्या विचारांनी घडलेली सामाजिक जाणीव यामुळे विदर्भाने भारताच्या बौद्धिक व नैतिक पायाला बळ दिले आहे. नागपूर आज लॉजिस्टिक्स, विमानवाहतूक, तंत्रज्ञान आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे. भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी असलेले नागपूर, नियोजनबद्ध शहरी विकास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जपत आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे.
या बदलामागे राजकीय नेतृत्वाची निर्णायक भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास धोरणामुळे विदर्भासारख्या संसाधनसमृद्ध भागांना राष्ट्रीय विकासाच्या केंद्रस्थानी स्थान मिळाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनामुळे देशभरातील महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि लॉजिस्टिक्स कॉरिडॉर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ‘धमन्या’ बनल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला प्राधान्य देत संतुलित प्रादेशिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.
अदानी समूहाचा विदर्भातील सहभाग हा केवळ गुंतवणुकीपुरता मर्यादित नसून पिढ्यान्पिढ्यांचा असल्याचा पुनरुच्चार जीत अदानी यांनी केला. विदर्भात ऊर्जा सुरक्षेपासून रोजगारनिर्मितीपर्यंत आणि समुदाय सशक्तीकरणापर्यंतचा हा प्रवास असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याला २५ वर्षे ६,६०० मेगावाॅट विश्वासार्ह वीजपुरवठ्याचा करार
अदानी समूहाचा तिरोडा येथील ३,३०० मेगावॅट क्षमतेच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सुपरक्रिटिकल वीज प्रकल्प आहे. २०२५ मध्ये बुटीबोरी येथील ६०० मेगावॅट वीज प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून अडचणीत सापडलेल्या पायाभूत मालमत्तांना नवे आयुष्य दिले गेले. खवडा येथील सौरऊर्जा आणि उष्ण वीज प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राला ६,६०० मेगावॅट विश्वासार्ह वीजपुरवठा करण्याचा २५ वर्षांचा करार हा राज्याच्या औद्योगिक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा ठरेल, असेही जीत अदानी म्हणाले.
गोंधखैरीतील भूमिगत खाण प्रकल्पाचे उदाहरण देत त्यांनी जबाबदार खाणकामाची नवी मानके मांडली. कमी भूवापर, विस्थापन शून्य, स्फोट न वापरता उत्खनन, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, शून्य सांडपाणी आणि पाच हजार झाडांची लागवड – या माध्यमातून तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा समतोल साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर आंतराष्ट्रीय विमान देखभाल – दुरूस्ती केंद्र
लॉजिस्टिक्स क्षेत्रात बोरखेडी येथील आयसीडी आणि राज्यभरातील २४ सीमेवरील तपासणी नाके ताब्यात घेतल्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन निर्यातक्षमतेत वाढ होईल. मिहानमधील इंडामर टेक्निक्सच्या अधिग्रहणामुळे नागपूर आंतरराष्ट्रीय विमान देखभाल- दुरुस्ती केंद्र म्हणून उदयास येत आहे. अदानी फाउंडेशनच्या आरोग्य, शिक्षण, महिला स्वयंसहायता गट, पोषण, स्वच्छ पाणी, सौर प्रकाशयोजना आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर भर देत असल्याचेही अदानी म्हणाले.

