scorecardresearch

वा रं पठ्ठ्या! देशी दारूच्या फवारणीने पीक झाले झिंगाट; जेवणाळा येथील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील एका पठ्ठ्याने याच देशी दारूचा प्रयोग कीडनाशक म्हणून केला आहे.

farmer Spray liquor on crop
जेवणाळा येथील शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग (image – loksatta team/graphics)

भंडारा : दारू अनेकांचा संसार उद्ध्वस्त करते. मात्र, दारूचा चांगला उपयोगदेखील होऊ शकतो, असे म्हणायला आता हरकत नाही. लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील एका पठ्ठ्याने याच देशी दारूचा प्रयोग कीडनाशक म्हणून केला आहे. धान पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी करून ‘दारू नही दवा है’ म्हणत नर्सरीतील रोपांना रोगमुक्त करण्याचा प्रयोग रामदास गोंदोळे या तरुण शेतकऱ्याने यशस्वीरित्या केला. त्यामुळे आता दारूचा असाही प्रयोग करून पाहण्यास हरकत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

लाखनी परिसरात सध्या उन्हाळी धान रोवणीसाठी नर्सरीची तयारी सुरू आहे. वातावरणातील वाढती उष्णता आणि धुके पडण्याचे प्रमाण वाढल्याने धानाचे पऱ्हे पिवळे पडून कीडग्रस्त होत आहेत. अशावेळी शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत. मात्र, रामदास गोंदोळे यांनी नर्सरीतील रोपांवर चक्क देशी दारूची फवारणी केली. काही दिवसांतच नर्सरीतील रोपे रोगमुक्त झाल्याचे ते सांगतात. उमेश गोंदोळे यांनी एक पंप फवारणीसाठी ९० मिली. देशी दारू व सोबत एक पाव युरिया एकत्र करून त्याची फवारणी केल्याने रोपे टवटवीत झाली. त्यामुळे पिकाची चांगली वाढ होऊन ते लवकरच रोवणी योग्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – आप, वंचित, बसपाची मतांची मजल मर्यादितच

कृषीसाठी हा प्रयोग नवा नाही. कोणत्याही कृषी विद्यापीठाने पिकांवर मद्यप्रयोगाला अधिकृत परवानगी दिलेली नाही. पण, पिकांवर मद्यप्रयोग परिणामकारक असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. आता इतर शेतकरीसुद्धा हा देशी जुगाड वापरत आहेत.

हेही वाचा – बुलढाणा : लिंगाडे पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; तब्बल साडेचार दशकांनंतर राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती

…अन् रोपे हिरवीगार, रोवणीयोग्य झाली

थंडी वाढल्यामुळे धानाच्या नर्सरीतील रोपे पिवळी पडून त्यांची वाढ खुंटली होती. यासाठी इतर औषधांची फवारणी केली. मात्र, सुधारणा झाली नाही. त्यामुळे देशी दारू व युरिया खताची फवारणी करून पाहिली. काही दिवसांतच नर्सरी हिरवीगार होऊन रोपे रोवणी योग्य झाले आहेत, असे रामदास गोंदोळे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:26 IST