गडचिरोली : झारखंडमधील चतरा आणि हजारीबाग जिल्ह्यांच्या सीमावर्ती बटुका परिसरात शुक्रवारी सुरक्षा दलांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. यामध्ये १५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षल्यांचा सबझोनल कमांडर सहदेव महतो याचा समावेश असून, या कारवाईमुळे नक्षलवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.

गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, हजारीबागचे पोलीस अधीक्षक सुमित कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोब्रा बटालियन आणि स्थानिक पोलिसांनी या भागात संयुक्त शोधमोहीम हाती घेतली होती. जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनीही तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीत चार नक्षलवादी जागीच ठार झाले, तर काही जखमी नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मृतांची ओळख पटली

चकमकीनंतर राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत ठार झालेल्या चारही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने जहाल नक्षली सहदेव महतो, महिला नक्षलवादी नताशा, एरिया कमांडर बुधन करमाली आणि बुद्धदेव यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफली, एक इन्सास, एक कोल्ट एआर रायफल, जिवंत काडतुसे, देशी बनावटीची शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या आयईडी स्फोटांत ६ जवान जखमी झाल्याने या परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी मिळालेल्या या मोठ्या यशामुळे सुरक्षा दलांचे मनोधैर्य उंचावले आहे.

‘मिसिर बेसरा’ रडारवर

दरम्यान, नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या मिसिर बेसराला पकडण्यासाठी जवानांनी सारंडा जंगलात सध्या कडक नाकेबंदी आणि सापळा रचला आहे. आतापर्यंत जवानांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरलेल्या बेसराच्या मुसक्या आवळण्यासाठी सुरक्षा दलांनी विशेष रणनीती आखली असून, लवकरच तो देखील पकडल्या जाईल असा दावा सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त केल्या जात आहे.