अकोला : खारपाणपट्ट्यात मोठी सिंचन व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी जिगाव सिंचन प्रकल्पाचे काम मागील तीस वर्षांपासून सुरू आहे. अपुऱ्या निधीसह विविध कारणांमुळे जिगावला कायम अडथळ्यांचा सामना करावा लागला. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ६५ टक्के भूसंपादन झाले असून अद्यापही ३५ टक्के बाकी आहे. आणखी चार हजार ४११ हेक्टर जमीन घेण्यासाठी दोन हजार ३०३ कोटींची गरज लागेल. वेळीच हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर सध्याच्या दुष्काळात देखील एक लाख १६ हजार हेक्टरवर समृद्धी असती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

१७ हजार ८३० हेक्टरवर प्रकल्प

जिगाव प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर तयार केला जात आहे. प्रकल्पाच्या माती धरणाची एकूण लांबी ८.६१ कि.मी. असून महत्तम उंची ३५.२५ मी. आहे. प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ७३६.५८ द.ल.घ.मी. असून एकूण १५ उपसा सिंचन योजना अंतर्भूत आहेत. जिगाव प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्रात वितरण व्यवस्था बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे प्रस्तावित आहे. त्याद्वारे बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील एकूण एक लाख १६ हजार ७७० हे. क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात नियोजित आहे. जिगाव प्रकल्प एकूण १७ हजार ८३० हेक्टरवर उभारला जाणार आहे. त्यात १२ हजार ३१८ हेक्टरवर पहिला टप्पा, तर पाच हजार ५१२ हेक्टरवर दुसऱ्या टप्प्याचे नियोजन केले.

पहिल्या टप्प्यात ६५ टक्के भूसंपादन

पहिल्या टप्प्यातील सात हजार ९०७ हेक्टर म्हणजेच ६५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले. चार हजार ४११ हेक्टर भूसंपादन अद्यापही बाकी आहे. बुडीत क्षेत्राचे चार हजार ३१७ हेक्टर भूसंपादन करावे लागणार असून ती खासगी जमीन आहे. पुनर्वसनासाठी ३४ हेक्टर खासगी जमीन, उसिंयोसाठी २३ आणि वितरण व्यवस्थेसाठी ३७ हेक्टर जमीन संपादित करावी लागेल. २०२६-२७ व २०२७-२८ मध्ये प्रत्येकी दोन हजार २०५ अशी एकूण चार हजार ४११ हेक्टर संपादित करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले. मात्र, त्यामध्ये निधीचा मुख्य अडथळा ठरणार आहे.

भूसंपादनाचे ७७ प्रकरण; व्याजाचा भुर्दंड

जिगाव सिंचन प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी चार हजार ४११ हेक्टर भूसंपादन करावे लागणार असून त्याचे ७७ प्रकरणे आहेत. तीन हजार ३५९ कोटी त्यासाठी लागणार असून एक हजार ०५६ कोटींचा भरणा केला. दोन हजार ३०३ कोटीची गरज राहील. अंतिम निवाडा घोषित केल्यानंतर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे. कलम १९ मधील एक हजार ७५१ हेक्टर निधीअभावी वारंवार मुदतवाढ घेत असल्यामुळे १२ टक्के प्रमाणे वार्षिक ५२ कोटी रुपयांचा भुर्दंड पडत असल्याचा प्रकार देखील समोर आला.