अमरावती : जेवणावरून झालेल्या वादात एका बारा वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर अपघाताचा बनाव रचण्यात आला. मात्र, पोलिसांच्या तपासात घटनेचे बिंग फुटले. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली. दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी रात्री भातकुली ठाण्याच्या हद्दीत चेचरवाडी मार्गावर घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
जितेराजा अरुण गौड (१२) रा. बरायठा, मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी बब्बू बिसनाथ गौड (२२) व अरुण गौड (४२) दोघेही रा. बरायठा, मध्यप्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी अरुणला अटक करण्यात आली असून बब्बूवर उपचार सुरू आहेत. जितेराजा व बब्बू हे आपल्या कुटुंबीयांसह सहा ते सात दिवसांपूर्वी साडी विक्री करण्यासाठी मध्यप्रदेशातील बरायठा येथून भातकुली परिसरात वास्तव्यास आले होते.
बुधवारी रात्री जितेराजा व त्याचा नातेवाइक बब्बू यांच्यात जेवणावरून वाद झाला. या वादात त्या दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात बब्बूने जितेराजा याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हा प्रकार दोघांच्याही कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांना तातडीने भातकुली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी जितेराजा याला मृत घोषित केले.
तर बब्बूला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेनंतर कुटुंबीयांनी अपघाताचा बनाव रचला. अज्ञात दुचाकीच्या धडकेत जितेराजा याचा मृत्यू झाला. तर बब्बू जखमी झाल्याची तक्रार अरुण याने भातकुली ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती घेतली. पथकाने जितेराजा व बब्बू यांच्या अंगावरील जखमांची प्रथमदर्शनी पाहणी केल्यावर त्या कोणत्या तरी धारदार शस्त्राने झालेल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने जितेराजा याचे वडील अरुण व नातेवाइक यांची कसून चौकशी केली.
त्यावेळी त्यांनी जेवणावरून झालेल्या वादातून बब्बू याने जितेराजा याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचे सांगितले. या प्रकरणी भातकुली ठाण्यात बब्बू व अरुण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अरुणला अटक करण्यात आली असून बब्बूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

