राजेश्वर ठाकरे
नागपूर : भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या अग्निवीरांना भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देण्याच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय राज्य मंत्री व माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्याला विनोद संबोधले आहे. व्ही.के. सिंह एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

अग्निवीरांचे चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून ठेवले जाईल, असे वक्तव्य विजयवर्गीय यांनी केले आहे असे विचारले असता सिंह म्हणाले, त्यांनी विनोद केला असावा. केंद्रीय गृहमंत्रालय, हरयाणा, उत्तर प्रदेश सरकारने अग्निरक्षकांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करावे. ज्या राज्यात आंदोलन होत आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा करावी.

‘अग्निपथ’ योजनेबाबत जनरल व्ही.के. सिंह म्हणाले, कारगिल युद्धानंतर एक समिती स्थापन करण्यात आली. तेव्हा अग्निपथ योजनेची कल्पना समोर आली होती. ती कशाप्रकारे कार्यान्वित केली जाईल यावर विचारमंथन सुरू होते. भारतात लष्करी प्रशिक्षण अनिवार्य करण्याची मागणी गेल्या ३०-४० वर्षांपासून होत आहे. ते काम राष्ट्रीय छात्र सेनामार्फत (एनसीसी) व्हावे, असे आम्ही म्हणतो. परंतु लष्करातूनच प्रशिक्षण मिळणे योग्य राहील, अशी मागणी होती. अग्निपथ योजनेतून युवकांना लष्करी प्रशिक्षण मिळेल. त्यातील ७५ टक्के युवक चार वर्षांनी कार्यमुक्त होतील आणि ज्यामध्ये विशेष गुण असतील ते सेवेत नियमित होतील. या योजनेमुळे दोन्ही उद्देश पूर्ण होतील, असेही व्ही.के. सिंह म्हणाले.

भरतीसाठी आम्ही निमंत्रण दिले का?
भारतीय लष्करात स्वेच्छेने भरती व्हायचे असते. अग्निपथ या योजनेत देखील स्वेच्छेने यायचे आहे. तुम्हाला भरती व्हायचे नसेल तर नका होऊ. बसेस, रेल्वेगाड्यांना आगी का लावता?तुम्हाला लष्करात नोकरीसाठी या, असे कुणी निमंत्रण दिले आहे का, सवालही सिंह यांनी केला.

आंदोलनासाठी युवकांना भाड्याने घेतले
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता सिंह म्हणाले, राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू असल्याने काँग्रेस अवस्थ आहे. त्यातून काँग्रेस ‘अग्निपथ’ योजनेबाबत युवकांची दिशाभूल करीत असून देशात दंगली भडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशिक्षण संस्थांना पैसे देऊन युवकांना आंदोलनात सहभागी करवून घेतले जात आहे.