नागपूर : बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची अलिकडेच माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भेट घेतली. मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे गवई सहकुटुंब पोहोचले. त्यांच्या या भेटीचे छायाचित्र स्वत: बागेश्वर धामच्या एक्स अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आले.
जेव्हा न्याय, कर्तव्य आणि श्रद्धा एकत्रित येतात, तेव्हा समाजाला नवी दिशा प्राप्त होते, अशा आशयाच्या संदेशासह बागेश्वर धामच्या अधिकृत अकाउंटवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर ही भेट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली. या भेटीवर लोकांमधून विशेषत: आंबेडकरी समाजामधून संतप्त प्रतिक्रिया उमटला. राजकीय पक्षांनीही यावर भाष्य केले.
न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन
न्यायमूर्ती गवई ज्या पदावर बसले होते, ते पद संविधानाच्या रक्षणाचे आहे. अशा जबाबदार पदावरील व्यक्तीने जेव्हा ‘अंधश्रद्धेचे माहेरघर’ समजल्या जाणाऱ्या बागेश्वर धामसारख्या ठिकाणी जाऊन विधी-विधान करणे, हे केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग उरत नाही. ही भेट आंबेडकरी विचारधारा ह्याची शोकांतिका आणि विचारांशी प्रतारणा आहे.बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या भोंदूगिरी, कर्मकांडांविरुद्ध लढा दिला, त्याच कर्मकांडांचे समर्थन करताना आजचे तथाकथित ‘आंबेडकरी’ उच्चपदस्थ दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयात बसलेली व्यक्ती जेव्हा अशा चमत्कारांचा दावा करणाऱ्या पीठावर जाते, तेव्हा समाजातील सामान्य वर्गाला अंधश्रद्धा पाळण्यात काहीच गैर नाही असा चुकीचा संदेश जातो. संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसून ‘अंधश्रद्धेच्या धाम’ची वारी करणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आंबेडकरी जनतेने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून, बोध घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली.
सोशल मिडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
फेसबुकवर गणेश पवार नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की ‘बाबासाहेबांचे मुझे मेरे पढे लिखे लोगो ने धोका दिया है’ हे वाक्य तंतोतंत लागू होत आहे. रामचंद्र येवतीकर यांनी लिहिले कितीही शिकले तरी मनुस्मृतीचे मूळ संस्कार जात नाही. एका दुसऱ्या व्यक्तीने उपरोधिकपणे लिहिले की गवई साहेबांच्या वागण्यावरून असे समजते की साहेबांनी बागेश्वर धामला जाण्यासाठी फारच उशीर केला. त्यांनी या अगोदरच जायला हवे होते. शंकर यादव नावाच्या व्यक्तीने लिहिले, आयुष्यभर संविधानाच्या नियमाने चालणारा व्यक्ती ज्यावेळेला धर्माच्या गोतावळ्यात अडकला जातो. त्यावेळेला त्याची विद्वता कुठे संपली की काय, असा प्रश्न निर्माण होतो. दीपक जाधव यांनी लिहिले की डॉ.आंबेडकर असते तर त्यांना मनस्ताप झाला असता.
