वर्धा : सातासमुद्रापलीकडे आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळणे, ही बाब कौतुकास्पद अशीच. ते पण देशाचे थोर सुपुत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आयोजित होणाऱ्या सोहळ्यात सादर निमंत्रण असेल तर मानाची बाब ठरणार. असेच एक निमंत्रण वर्धेकर सुपुत्रास मिळाले आहे. जागतिक स्तरावर आयोजित हा सोहळा विद्वान लोकांसाठी एक पर्वनी ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.

लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड लीडर डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवार्ड-२०२६ या कार्यक्रमात महाराष्ट्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष आणि वर्ध्याचे सुपुत्र न्यायमूर्ती सी. एल. थूल यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हा सोहळा ८, ९ आणि १० मे २०२६ रोजी लंडन येथील एसओएसएस यूनिवर्सिटी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत ८ मे रोजी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसंवाद आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये समता, न्याय, सुशासन, मानवाधिकार, शांतता आणि नवोपक्रम या विषयांशी संबंधित विद्वान सहभागी होणार आहेत. ९ मे रोजी आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिसंवाद होणार असून त्यामध्ये उद्योजक, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी, नवोन्मेषक आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक नेते सहभागी होणार आहेत.

१० मे रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आंबेडकर गौरव सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती विश्व लीडर टेकमीडिया प्रा. लि. चे संचालक शिरीष रामटेके यांनी दिली. या महत्त्वपूर्ण जागतिक सोहळ्यात न्या. सी. एल. थुल यांना आमंत्रित केल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांना मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची ओळख होईल तसेच उपस्थितांना त्यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

न्या. थुल यांना यूनायटेड इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल मॅनेजमेंट वाशिंगटन डीसी या प्रतिष्ठित संस्थेने मॅनेजमेंट आणि लीडरशिप या विषयात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांनी देश-विदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये कायदा, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयांवर व्याख्याने दिली आहेत.

लंडन येथून मिळालेल्या या आमंत्रणामुळे वर्धा शहरातील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. न्या. थूल यांच्या कार्याचा परिचय उभ्या महाराष्ट्रास आहे. एका साधारण कुटुंबातून येत त्यांनी जिद्द ठेवत आपली वाटचाल केली.