नागपूर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाला आता न्यायिक वर्तुळातील मतभेदांचीही किनार मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी लाखो नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित करणारी कोणतीही प्रक्रिया मनमानी आणि घटनात्मक व्यवस्थेला छेद देणारी ठरेल, असे वक्तव्य केले होते. मात्र, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या विषयावर विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशांनी सार्वजनिक भाष्य करणे न्यायिक शिस्त आणि मर्यादेला धरून नाही, असे गवई यांनी स्पष्ट केले.
नेमके काय म्हणाले होते न्या. भुयान?
न्या. भुयान यांनी हैदराबाद येथील नालसार विद्यापीठात ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या १९व्या न्या. बोधराज साव्हनी स्मृती मूट कोर्ट स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमात भाषण केले. या वेळी त्यांनी मतदानाचा अधिकार आणि मतदार यादीतून नाव वगळण्याच्या प्रक्रियेबाबत घटनात्मक तरतुदींचा संदर्भ दिला.
मतदार यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीचे नाव वगळताना संबंधित व्यक्तीला योग्य नोटीस आणि सुनावणीची संधी मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. लाखो नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित करणारी कोणतीही प्रक्रिया ही ‘स्वतःतच मनमानी’ ठरेल आणि ती घटनात्मक व्यवस्थेला नकार देणारी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
‘नागरिकत्वातून मतदानाचा अधिकार वेगळा करता येणार नाही’
मतदानाचा अधिकार हा लोकशाहीच्या पायाभूत रचनेचा महत्त्वाचा भाग असल्याचे न्या. भुयान यांनी अधोरेखित केले. भारतीय संविधानात मतदानाचा अधिकार असलेले आणि मतदानाचा अधिकार नसलेले असे नागरिकांचे दोन वर्ग निर्माण करण्याची कल्पना नाही, असे त्यांनी म्हटले.
मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची नावे वगळली गेल्यास त्यांना त्यांच्या देशातच मतदानाच्या अधिकारापासून वंचित नागरिक बनवले जाईल. अशा प्रक्रियेमुळे नागरिकत्वापासून मतदानाचा अधिकार वेगळा केल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गवईंचा आक्षेप नेमका कशावर?
न्या. भुयान यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी थेट त्यांच्या भूमिकेवर भाष्य करण्याऐवजी न्यायिक शिस्त आणि मर्यादेचा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विषयावर कोणत्याही न्यायालयातील विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीशाने सार्वजनिकरीत्या भाष्य करू नये, असे गवई यांनी म्हटले.
‘ज्या विषयावर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा कोणत्याही न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे, त्या विषयावर न्यायिक शिस्त आणि मर्यादा अशा प्रकारचे भाष्य करण्यास परवानगी देत नाहीत,’ अशी भूमिका गवई यांनी मांडली. त्यामुळे न्या. भुयान यांच्या वक्तव्याला त्यांनी ‘न्यायिक मर्यादेचा भंग’ असे संबोधले.
एसआयआरचा वाद सर्वोच्च न्यायालयातच
मतदार यादीच्या एसआयआर प्रक्रियेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेची घटनात्मक वैधता आणि त्यातून मतदारांच्या अधिकारांवर होणारा परिणाम हा न्यायालयीन विचाराधीन विषय आहे. न्या. भुयान यांनी आपल्या भाषणात एसआयआर किंवा निवडणूक आयोगाचे नाव थेट घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी एसआयआरवरील सुरू असलेल्या वादाशी जोडली जात आहे.
याच मुद्द्यावरून माजी न्यायमूर्ती एस. एन. धिंग्रा आणि आर. एस. सोढी यांनीही न्या. भुयान यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या विषयावर सार्वजनिक कार्यक्रमात भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
