अकोला : रेल्वे प्रशासनाने काचीगुडा आणि श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेचे नियमित रेल्वे सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित रेल्वे म्हणून चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, विश्वासार्ह व नियमित सेवा उपलब्ध होणार आहे.
रेल्वे गाड्यांना नवीन क्रमांक राहणार
सध्या चालू असलेल्या गाडी क्रमांक ०७०५३ / ०७०५४ काचीगुडा – श्री गंगानगर विशेष रेल्वेचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १७६०१ काचीगुडा – श्री गंगानगर एक्सप्रेस (साप्ताहिक) २५ जुलैपासून दर शनिवारी काचीगुडा येथून सुटेल. गाडी क्रमांक १७६०२ श्री गंगानगर – काचीगुडा एक्सप्रेस (साप्ताहिक) २८ जुलैपासून दर मंगळवारी श्री गंगानगर येथून सुटणार आहे. गाडी क्रमांक १७६०१ काचीगुडा – श्री गंगानगर एक्सप्रेस दर शनिवारी काचिगुडा येथून २२ वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी श्री गंगानगर येथे २१.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक १७५०२ श्री गंगानगर – काचीगुडा एक्सप्रेस दर मंगळवारी श्री गंगानगर येथून ०६.५५ वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी काचीगुडा येथे ०७.१५ वाजता पोहोचेल.
‘या’ रेल्वेस्थानकावर गाड्या थांबणार
या नियमित झालेल्या रेल्वे गाड्यांना मलकाजगिरी, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रींगस, सीकर, चुरू, रतनगड, श्री डूंगरगड, बिकानेर, लालगड, लूनकरणसर, सूरतगड, रायसिंगनगर आणि श्रीकरणपूर या स्थानकावर थांबा राहणार आहे. वातानुकूलित द्वितीय श्रेणी दोन डबे, वातानुकूलित तृतीय श्रेणी आठ डबे, शयनयान श्रेणी सहा डबे, सामान्य द्वितीय श्रेणी चार डबे, जनरेटर कार दोन डबे, अशी गाडीची रचना राहणार आहे.
मध्य व दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या नियमित
मध्य व दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्यांना रेल्वे प्रशासना नियमित केले आहे. त्यामध्ये अकोला – तिरुपती एक्स्प्रेससह विविध गाड्यांचा समावेश आहे. विशेष गाड्या नियमित केल्याने तिकीटामध्ये प्रवाशांची आर्थिक बचत होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी रेलवन ॲपचा वापर करू शकतात. या गाड्यांच्या वेळापत्रक व थांब्यांविषयी सविस्तर माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
