वर्धा : पवित्र कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय भाविकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी मार्गदर्शक नियमावली (Advisory) जारी केली आहे. संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व वैध कागदपत्रे हातात असल्याशिवाय प्रवासाला सुरुवात करू नका, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिला आहे. खाजगी टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून यात्रेला निघालेले तब्बल ५२ भारतीय भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सरकारने तातडीने हे पाऊल उचलले आहे. ऑल इंडिया रेडिओने याबाबत माहिती दिली आहे.

नेपाळमध्ये भाविक का अडकले?

मिळालेल्या माहितीनुसार, अडकलेले हे सर्व भाविक खाजगी ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून नेपाळमार्गे तिबेटमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला चीनी व्हिसा आणि विशेष परवाना (Entry Permit) त्यांच्याकडे नव्हता. “पुढील प्रवासाची परवानगी नंतर मिळून जाईल,” अशा केवळ अपेक्षेवर आणि खाजगी ट्रॅव्हल एजंट्सच्या आश्वासनावर विसंबून या भाविकांनी भारतातून प्रवासाला सुरुवात केली. परंतु, पुरेशी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास रोखण्यात आले. परिणामी, हे सर्व भाविक काठमांडूमध्ये अडकून पडले असून त्यांनी आता भारत सरकारकडे मदतीची याचना केली आहे.

खासदार सुप्रिया सुळेंनी वेधले लक्ष

हा गंभीर प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणला. त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासांना या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली. “काठमांडूमध्ये अडकलेल्या ५२ भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे पुढे नेण्यासाठी किंवा मायदेशी आणण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे,” असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर सरकारी यंत्रणा वेगाने हलल्या आणि हा इशारा जारी करण्यात आला.

परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

या घटनेची गंभीर दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, “कागदपत्रे नंतर मिळतील या आशेवर प्रवास सुरू करणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. यामुळे भाविक मध्यंतरीच अडकून पडण्याची, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची आणि मानसिक त्रास सहन करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे संपूर्ण मार्गाची कागदपत्रे निश्चित (Confirm) झाल्याशिवाय घरून निघू नका.” याशिवाय, कोणत्याही खाजगी टूर ऑपरेटरकडे बुकिंग करण्यापूर्वी तो अधिकृत आणि सरकारमान्य आहे की नाही, याची काटेकोर तपासणी करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

अधिकृत यात्रा सुरक्षित सुरू

दरम्यान, केंद्र सरकारतर्फे आयोजित केली जाणारी अधिकृत ‘कैलास मानसरोवर यात्रा २०२६’ सुरक्षितपणे सुरू झाली आहे. यात्रेकरूंची पहिली तुकडी २० जून रोजी सिक्कीममधील नथुला पास (Nathu La Pass) द्वारे चीनच्या सीमेत दाखल झाली आहे. सरकारी मार्गाने जाणाऱ्या भाविकांची कागदपत्रे आणि सुरक्षा यांची जबाबदारी दोन्ही देशांचे प्रशासन संयुक्तपणे सांभाळते. मात्र, जे भाविक खाजगी चालकांवर विसंबून नेपाळचा मार्ग निवडतात, त्यांनी स्वतः सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही एजंट्सच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन वरिष्ठ अधिकार्‍यांनी केले आहे.