लोकसत्ता टीम
बुलढाणा : निःस्वार्थ शेतकरी आंदोलक आणि प्रयोगशील शेतीसाठी शासन पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी अखेर शेतकऱ्याच्या मागणीसाठी स्वतःची आहुती दिली. त्यांच्या धक्कादायक आत्महत्येने त्यांच्या मुळगावी शिवणी अरमाळ (तालुका देऊळगाव राजा ) मध्ये आज सकाळपासून निर्माण झालेला तणाव दुपारी उशिरा पर्यंत कायम आहे.
गावासह पंचक्रोशीतील हजारो शेतकरी शिवणी अरमाळ येथे उत्स्फूर्त ठिय्या ठेवून आहे. दरम्यान प्रक्षुब्ध नातेवाईक आणि शेतकऱ्यांची समजूत घालण्यात शासकीय यंत्रणाना अखेर यश आले. शहीद कैलास नागरे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून देऊळगाव मही ( तालुका देऊळगाव राजा ) येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात येणार आहे. घटनेची माहिती मिळताचा पालकमंत्री मकरंद पाटील, सिंदखेड राजा आमदार मनोज कायंदे यांनी अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने प्रक्षुब्ध नातेवाईक, गावकरी यांची समजूत घातली. त्यामुळे तणाव कमी झाला. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ,ठाणेदार रुपेश शक्करदरे यांनी यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यासाठीच जगले, पाण्यासाठी जीवनाची होळी!
दरम्यान शेतीची मनःपूर्वक आवड असलेल्या कैलास नागरे यांना स्वतःला ‘काळ्या मातीचे धनी’ म्हणवून घेण्यात अभिमान वाटायचा. त्यांच्या बहुचार्चित अन्नत्याग आंदोलनाच्या बॅनर वर देखील कैलास नागरे उफ काळ्या मातीचा धनी असा स्वतःचा उल्लेख केल्याचे दिसून येते.सहकारी बना सहकारी बनवत चला हे त्याचे घोषवाक्य होते.
परिसरातील शेतकऱ्यांना आश्वासित पाणी मिळावे यासाठी कैलास नागरे यांनी आठ दिवस आमरण उपोषण केले होते, हा लढा शासन दरबारी तीव्र करण्यासाठी ते नागरिकांना आवाहन करत होते की हा प्रश्न सुटावा यासाठी माझे सहकारी बना आणि मला सहकारी बनवत चला. मात्र हजारो शेतकऱ्यांना आपले जिवलग सहयोगी केल्यावर नागरे यांनी आत्मघाताचा निर्णय घेत आता त्यांना पोरके केले आहे.
खऱ्या अर्थाने अर्धांगिनी या लढवय्या शेतकरी नेत्याची
पत्नी खऱ्या अर्थाने अर्धगिनी होती.खांद्याला खांदा लावून लढत होती. कैलास नागरे यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले याची दखल शासनाने घेत त्यांना राज्य शासनाचा महत्त्वाचा पुरस्कार देखील दिला होता मात्र त्यांच्या प्रत्येक यशामध्ये त्यांच्या पत्नीचा मोठा सहभाग व साथ त्यांना मिळाली.मग ते उपोषण असो किंवा शेतीमध्ये अभिनव प्रयोग मध्येही त्यांचा महत्वाचा वाटा राहिला.
सुसाईड नोट शेतकरी आत्महत्याची मिमांसा
नागरे यांनी लिहिलेली सुसाईड नोट म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतो याची कारण मिमांसा ठरावी अशी आहे. त्यांनी लिहिले की आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत, फक्त शेतीला हमी पाणी नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सातत्य राहत नाही, त्यांचा आर्थिक समतोल बिघडतो आणि कर्जबाजारी होतो अन् वैफल्यग्रस्त होऊन तो नैराश्येच्या गर्तेत जातो. त्याला जगणे असह्य होते असेही कैलास नागरे यांनी लिहिले आहे.