अकोला : इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल संघ तब्बल १५ हजार २८६ कोटी रुपयात विकत घेणाऱ्या अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक कैलास (कल) सोमाणी यांचे विदर्भाशी खास नाते आहे. ते मूळचे वाशीमकर आहेत. लहानपणापासून त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या कल सोमाणी यांनी संघर्षातून कोट्यवधींचे मोठे साम्राज्य निर्माण केले. त्यांची यशस्वी वाटचाल नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व आदर्श ठरत आहे.
आयपीएल चषकाचा हंगाम नुकताच सुरू झाला. पहिला आयपीएल चषक जिंकणारा राजस्थान रॉयल संघ अमेरिकेतील उद्योजक कल सोमाणी यांनी १.६३ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १५२८६ कोटी रुपयांना खरेदी केला. त्यामुळे कल सोमाणी विशेषतः भारतात प्रकाशझोतात आले. त्यांची पार्श्वभूमी काय याची चर्चा रंगू लागली.
वाशीममध्ये जन्म, शेगावला उच्चशिक्षण
१५ ऑगस्ट १९७४ रोजी वाशीम येथे जन्मलेल्या कैलास सोमाणी यांचे बालपण सर्वसामान्य कुटुंबात गेले. वडील स्व. नंदकिशोर सोमाणी यांच्या निधनानंतर केवळ १६ व्या वर्षीच त्यांच्यावर जबाबदारी आली. कल यांचे वडील त्याकाळी वाशीम नगर पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदी निवडून आले होते. वाशीममध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर पुसद नाका परिसरातील जवाहर कॉलनीमध्ये आजही आहे. आई लिलादेवी मुलांसोबतच अमेरिकेत राहतात.
लहानपणापासून क्रिकेटची आवड असली, तरी घरात टीव्हीही नसलेल्या परिस्थितीत त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. वाशीममध्ये मुलीबाई चरखा विद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेगावच्या संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी त्यांनी मिळवली. साधारणत: २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ते अमेरिकेत स्थायिक झाल्याची माहिती त्यांचे अकोल्यातील चुलत भाऊ राहुल सोमाणी यांनी दिली.
अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश
मोठे बंधू सुबोध सोमाणी हे अमेरिकेत स्थायिक आहेत. कैलास यांनी देखील अमेरिकेत जाऊन आयोवा राज्यातील सीडर रॅपिड्स येथे नोकरीची सुरुवात केली. पुढे ॲरिझोनात स्वतःचा व्यवसाय उभारून त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश संपादन केले. एडटेक, डेटा गोपनीयता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशासन आणि क्रीडा तंत्रज्ञान, क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अमेरिकेत उच्चारण सोपे होण्यासाठी कैलासऐवजी कल सोमाणी या नावाने ते प्रचलित झाले. त्यांना मुलगा अर्जुन व मुलगी सानिया ही दोन अपत्ये आहेत. मुलगा १४ वर्षांखालील गटात गोल्फ खेळात विश्वविजेता ठरला. त्यांची बहीण डॉ.रश्मी नरेश बजाज अकोल्यात राहते.
क्रिकेट अकादमीची स्थापना
क्रिकेटची आवड कायम ठेवत त्यांनी अकोला-नागपूर महामार्गावरील तळेगाव शामजीपंत येथे क्रिकेट अकादमीची स्थापना केली. या अकादमीमध्ये गरीब विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून त्यांनी एक कोटी रुपयांची मदतही दिली आहे. जन्मस्थळ वाशीमशी त्यांची नाळ अजूनही जुळली आहे.
अमेरिकेत मोठा व्यवसाय; भारतातही विस्तार
अमेरिकेत त्यांच्या कंपनीत हजार ते बाराशे कर्मचाऱ्यांना रोजगार दिला असून पुणे शहरात ४०० कर्मचारी आहेत. हैदराबाद शहरात ते व्यवसायानिमित्त पदार्पण करीत असल्याची माहिती आहे.
