नागपूर : महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना, कृषी उत्पन्न बाजार समिती (कृ.उ.बा.स.)च्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ जय किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशनतर्फे गुरुवार (५ फेब्रुवारी) पासून कळमना बाजारात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या आंदोलनाला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

आंदोलनात भाजीपाला व फळ विक्रेत्यांसह धान्य विक्रेत्यांचाही सहभाग असल्याने भाजीपाला व फळ पुरवठ्यावर परिणाम होऊन त्यांचे दर वाढण्याची शक्यता आंदोलक व्यक्त करत आहे.

असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले की, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मनमानी कारभार सुरू असून आडते व परवाना धारक व्यापाऱ्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. महात्मा फुले मार्केटमधून स्थलांतरित व्यापाऱ्यांना दुकाने दिल्यानंतर त्यांच्यावर भाडे व डिपॉझिट लादण्यात आल्याने आर्थिक अन्याय झाला आहे.

तसेच, पणन संचालकांच्या मंजुरीपत्रातील तरतुदींचे पालन न करता स्थलांतरित व्यापाऱ्यांना लिलावाद्वारे दुकाने न देता, संबंधित व्यापाऱ्यांना प्राधान्य न दिल्यामुळे अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थलांतरित आडत्यांना प्राधान्य तत्त्वावर दुकाने न देता सेसच्या चढउताराचे कारण पुढे करून त्यांना दुकाने सोडण्यास भाग पाडण्यात आल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.

पणन संचालकांना चुकीची माहिती देऊन मिळवलेल्या मंजुरीपत्रातील नियम क्रमांक १ ते ६ डावलून मनमानी पद्धतीने दुकानांचे वाटप करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या अहवालात सभापतींच्या अधिकारांबाहेरील विविध बेकायदेशीर कृत्यांचा उल्लेख असूनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे.

मंजूर तरतुदींविरोधात किरायापत्र तयार करून व्यापाऱ्यांवर जबरदस्तीने ते नोंदणीकृत करून घेण्यात आल्याचा तसेच मंजुरीपत्रात लिलावाचा स्पष्ट प्रावधान नसताना ९० वर्षांच्या लीजऐवजी २९ वर्षांचे किरायापत्र करून व्यापाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. लहान दुकानांमध्ये दोन-दोन व्यापाऱ्यांना बसविण्यात आल्यामुळे व्यापाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, जुन्या व्यापाऱ्यांना बेदखल करून नव्या व्यापाऱ्यांच्या नावावर मागील तारखेने सेस भरून दुकाने देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर यांनी दिलेल्या अहवालानुसार नियम, मंजुरीपत्र आणि उपनियमांचे उल्लंघन करून सभापतींनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. कृ.उ.बा.स. नागपूरचे सभापती कथित कुशासन, एकतर्फी निर्णय, घुसखोरी आणि व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी जय किसान व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे सचिव विरेंद्र मेंढे यांनी केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलन दीर्घकाळ सुरू राहिल्यास भाजीपाला, फळ पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.