नागपर : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे पडसाद आता नागपुरातही उमटले आहेत. मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध करत गुरुवारी (९ जुलै) काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोषींवर कठोर कारवाईसह डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नागपुरातील डॉक्टरांनी आंदोलनाचा निर्णय का घेतला?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर नगरसेवकासह एका गटाने हिंसक हल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), मेयो रुग्णालय तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने आंदोलनाची घोषणा केली आहे.
आंदोलन नेमके कसे होणार?
मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर गुरुवार, ९ जुलै रोजी काळ्या फिती लावून नियमित रुग्णसेवा देणार आहेत. रुग्णसेवा बंद न ठेवता निषेध नोंदविण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे. सेंट्रल मार्डच्या पार्श्वभूमीवर मेडिकल-मेयोच्या निवासी डॉक्टरांची बैठक झाली. डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णांची सेवा करतात. अशा वेळी त्यांच्यावर होणारे हल्ले केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरच नव्हे, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर आणि रुग्णसेवेवर गंभीर परिणाम करणारे असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
मार्डच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत?
मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष, जलद आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी मार्डने केली आहे. तसेच राज्यातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरजही संघटनेने व्यक्त केली आहे.
पुढे कोणती पावले उचलली जाणार आहेत?
सेंट्रल मार्डचे पदाधिकारी सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्याचे गृहमंत्री यांची भेट घेऊन डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजनांची मागणी करणार आहेत. वाढत्या हिंसाचारावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
सेंट्रल मार्डचे सरचिटणीस डॉ. आशुतोष आडे यांनी काय भूमिका मांडली?
डॉक्टरांवरील हल्ल्यांचे दुष्टचक्र अजून किती काळ सुरू राहणार? प्रत्येक घटनेनंतर निषेध, आश्वासने आणि त्यानंतर पुन्हा हल्ला, हे चित्र बदलले पाहिजे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भीतीमुक्त, सन्मानपूर्वक आणि सुरक्षित वातावरणात सेवा देण्याचा अधिकार आहे. केवळ तात्पुरत्या प्रतिक्रिया नव्हे, तर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत, असे डॉ. आशुतोष आडे यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनातून कोणता संदेश दिला जात आहे?
डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचाराविरोधात राज्यभर एकजूट निर्माण करण्याचा आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाच नसून रुग्णसेवेच्या भवितव्याशी संबंधित असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे.
